सुरक्षित पूल, सरकते जिने देता येत नाहीत, हे सरकार हायपर लूप आणि बुलेट ट्रेन काय देणार? - सचिन अहिर

04 Jul 2018 , 07:02:37 PM

अंधेरी येथील फुट ओव्हरब्रिज कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पण या घटनेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची आहे. कारण एल्फिन्स्टनच्या दुर्दैवी घटनेनंतर आपण कुठल्याही प्रकारचा बोध घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज दिली. ते पुढे म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्षांनी एकत्र येऊन अशी मागणी केली होती की संपूर्ण मुंबई शहरातल्या फुट ओव्हरब्रिजचं ऑडिट व्हायला पाहिजे. जिथे हे पूल नादुरुस्त आहेत तिथे तातडीने दखल घेऊन दुरुस्ती केली पाहिजे.” 


प्रशासनाने आपल्याच यंत्रणेवर अविश्वास दाखवत मोठा गाजावाजा करत आर्मीच्या लोकांना आणलं आणि एल्फिन्स्टन आणि लोअर परळचा ब्रिज दुरुस्त करण्याची भूमिका घेतली. त्याचं आम्ही कौतुकही केलं. मात्र दुर्दैवाने मुंबईच्या पादचाऱ्यांसाठी रेल्वेमार्गावर पूर्व-पश्चिमेला जोडणारा दुवा म्हणून काम करणाऱ्या पादचारी पुलांची दुरुस्ती झाली नाही, हे या दुर्घटनेतून स्पष्ट होतंय. सायन स्टेशन, धारावी, मसजिद इथल्या पुलांची दुरावस्था झालेली आहे. अंधेरीच्या पुलाची दुर्घटना ऐन गर्दीच्या वेळी झाली असती तर किती मोठी प्राणहानी झाली असती, याचा विचारही करवत नाही. हे सगळं निषेधार्ह आहे. 

भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर हा पूल रेल्वेच्या अखत्यारित येत नाही. ती महानगरपालिकेची जबाबदारी आहे, असे ट्विट केले, हे अत्यंत असंवेदनशील असून जबाबदारी टाळण्याचे लक्षण असल्याची टीका अहिर यांनी केली. मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री आणि भाजपा खासदार हायपर लूप, बुलेट ट्रेनची स्वप्नं दाखवत आहेत. पुलांची दुरुस्ती करणे जमत नसताना केवळ मोठा गाजावाजा करायचा, निर्णय घेतो अशा घोषणा करायच्या आणि करायचं मात्र काहीच नाही, हे प्रशासनाचे अपयश असल्याचे अहिर म्हणाले. तसेच प्रशासनाने यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांनी केली. पुलांच्या बाबतीत नेमकं काय ऑडिट झालं आहे, इतर पुलांची दुरुस्ती झाली का, झाली नसेल तर का नाही झाली, निधी उपलब्ध झाला नाही तर का नाही झाला, आणि जिथे निधी उपलब्ध होऊनही काम झालं नसेल तर ते कुणामुळे अडलं, हे सगळं मुंबईकरांना कळलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित लेख