सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याची अब्रू गेली, धनंजय मुंडे यांचा घणाघात

09 Jul 2018 , 09:07:11 PM

ढिसाळ नियोजन, लहरी वृत्ती आणि गांभीर्याचा अभाव यामुळे नागपूर अधिवेशनात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे राज्य सरकारची अब्रू गेली आहे, अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराची लक्तरे काढली.

नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच वीज गेल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे कामकाज दिवसभर तहकूब करण्याची नामुष्की सरकारवर आली. विधिमंडळाच्या इतिहासात वीज गेल्यावर कामकाज बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्याच्या कुठल्याही ग्रामपंचायतीची सभा, बैठकही अशाप्रकारे बंद होत नाही. ती वेळ सर्वोच्च सभागृहावर यावी, ही सरकारसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे मुंडे म्हणाले. तयारी नसताना केवळ दिखावा करण्यासाठी नागपूरला अधिवेशन घेण्याचा सरकारचा राजहट्ट होता हे या निमित्ताने दिसून आले आहे. राज्यात जलयुक्त शिवार अयशस्वी झाले असले तरी देवेंद्र फडणवीस सरकारने नागपुरात अधिवेशन घेऊन मात्र 'जलयुक्त नागपूर' राज्याला दाखवून दिले असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. सरकारकडे बॅकअप प्लॅन का नव्हता? असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी सरकारने जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच विद्युत विभागाचे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, महानगरपालिकेचे अधिकारी या परिस्थितीस जबाबदार असल्याने अधीक्षक अभियंत्यापासून कार्यकारी अभियंता आणि सर्व दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपाच्या ताब्यातील नागपूर महानगरपालिका असो की शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महानगरपालिका, ही दोन्ही महानगरे संकटात सुरक्षित ठेवण्यात आणि किमान सार्वजनिक सुविधा पुरविण्यात या दोन्हीही महापालिका अपयशी ठलव्या आहेत असे सांगत मुंडे यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. 

संबंधित लेख