जे संविधान बदलाची भाषा करतात ते भटक्या समाजाला चिरडायला मागेपुढे पाहणार नाहीत - धनंजय मुंडे

11 Jul 2018 , 09:06:06 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसू शकले, तोच पक्ष आणि त्यांचे मंत्री आज संविधान बदलायला निघाले आहेत. तिथे हे भटक्या समाजाला चिरडून टाकायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्याप्रकारची मानसिकता वाढीस लागली असून ही मानसिकता ठेचून काढण्याची गरज आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राईनपाडा घटनेवर आपला संताप व्यक्त केला आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात सरकारच्या अपयशावर जोरदार हल्लाबोल केला.

अल्पकालीन नियम ९७ अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला, या विषयावर त्यांनी आज मनोगत व्यक्त केले.

शाहू,फुले,आंबेडकर यांच्या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रासाठी राईनपाडाची घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. समाजातील गरीब, दुर्बल, वंचित आणि उपेक्षित घटकातील या पाच जणांची इतक्या अमानुषपणे हत्या होते, परंतु समाजातून दबका आवाज वगळता निषेधाचा तीव्र सूर उमटत नाही अशी खंतही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. अफवेच्या गैरसमजातून पाच जणांना ठेचून मारले जाते. अशा हत्या करण्यास समाज किंवा जमाव का तयार होत आहे याचा विचार करुन ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले. पाच निरपराधांना कोंडून त्यांची ठेचून हत्या जमाव करतो या जमावाला कायदयाची भीती का वाटत नाही? अशी हत्या करण्यास समाज का प्रवृत होतो? या झुंडशाही मागचा मास्टमाईंड, यामागची विचारसरणी शोधावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

राईनपाडा येथे घडलेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेनं सरकारचं अपयश स्पष्ट केलं आहे. संपूर्ण समाजात झुंडशाही, गुंडशाही, पुंडशाही बोकाळली आहे. त्यात समाजाला मदत करणारे हात अदृष्य झाले आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्या परंतु त्या गर्दीतून आवरणारे, सावरणारे हात पुढे यायचे पण आज असा एकही हात गर्दीतून पुढे येत नाही, ही गंभीर बाब असल्याची भीती धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
काही घटकांकडे पोट भरण्याची साधनं नसतील तर चोऱ्या, लूटमार करुन पोट भरण्यापेक्षा भीक मागून जगणं हा गुन्हा आहे का? असा सवाल करतानाच समाजातील या दुर्बल घटकांना संरक्षण देण्यास सरकार कमी पडले आहे हे या घटनेवरुन समोर येत आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
राईनपाडा प्रकरणाची जिल्हा पोलीस अधिक्षकाच्या मार्फत एसआयटी चौकशी करावी, या खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यात यावी, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये व कुटुंबातील व्यक्तीस नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अफवा पसरवणा-या सोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घालणारा कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली.

संबंधित लेख