सरकार निवडणूक यंत्रणा, कायदा-सुव्यवस्था, प्रसारमाध्यमे, या सर्वच गोष्टी हातात घेत आहे - जयंत पाटील

07 Aug 2018 , 07:05:37 PM

मोदी सरकारविरोधात पुढील ८ -१० महिने कोणतेही प्रसारमाध्यम बोलणार नाही असे चित्र दिसत आहे. अनेक संपादक आणि पत्रकारांचे राजीनामे हे त्याचे उदाहरण आहे. हे सरकार कायदा-सुव्यवस्था, निवडणूक यंत्रणा, प्रसारमाध्यमे या सर्व गोष्टी आपल्या हातात घेण्याचे काम करत आहे, अशी सडेतोड टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर केली. खंडाळा येथे पक्षाच्या वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराच्या उद्घाटन सोहळ्यास संबोधित करताना जयंत पाटील बोलत होते.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने आजवर १०६ योजना पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे. मात्र खरी परिस्थिती तशी नाही. या सरकारच्या बऱ्याच योजना लोकांना माहीत देखील नाहीत. स्कील डेव्हलपमेंट योजनेच्या माध्यमातून आजवर ४० कोटी लोकांचे स्किल डेव्हलपमेंट केल्याचे सांगितले जात आहे, पण आजपर्यंत हा आकडा २ कोटीपर्यंत देखील पोहोचलेला नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सरकार नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेईल अशी शक्यता आहे. सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घेतला तर समजा निवडणुका जवळ आल्या आहेत.

आघाडी सरकारच्या काळात पक्षाच्या वतीने मंत्रिमंडळात घेण्यात आलेले निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम वक्त्यांनी करावे. सरकार एप्रिल - मे २०१९ दरम्यान निवडणुका घेईल अशी चिन्हे आहेत. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याने पुढील काही महिने पक्षाच्या कामकाजावर जोर देण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. आपला पक्ष सर्वधर्म समभाव मानणारा आहे. पक्षात सर्वच समाजाचे हित जोपासले जाते, हे पक्षातील वक्त्यांनी प्रामुख्याने मांडावे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी बुथ कमिटीच्या बैठकांमध्ये हे सर्व विचार वक्त्यांनी मांडायला हवेत असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन दिवसीय वक्ता प्रशिक्षण शिबिरात विविध क्षेत्रातील अभ्यासक आणि वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शिबिराची सांगता होईल.

संबंधित लेख