निवडणुकीत दिलेली आश्वासने निवडणुकीनंतर विसरायची कशी हे भाजपने देशाला शिकवले – जयंत पाटील

09 Aug 2018 , 06:11:23 PM

लोकांना आश्वासने द्यायची आणि निवडणुकीनंतर ती विसरायची हे भाजपाने भारतात शिकवले आहे. कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार कोटीच्या पॅकेजचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी कल्याण-डोंबिवलीपासून जाहीरनाम्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे अवलंबवण्य़ास सुरुवात करावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
निवडणूक न लढविणाऱ्या आणि आश्वासनांची पूर्तता अहवाल सादर न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी दिली. त्यावर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. परंतु त्याची अमलबजावणी करताना याची सुरुवात कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनापासून करावी अशी आठवण प्रदेशाध्यक्षांनी करुन दिली.

नगरपालिकेत, महानगरपालिकेत जर पक्षाने आश्वासने दिली असतील व ती पूर्ण केली नाहीत तर त्या पक्षाची परवानगी आणि त्या पार्टीच्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची भूमिका सहारियासाहेब घेणार का? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

सहारिया यांनी पक्षांनी जाहीर केलेले जाहीरनामे प्रकाशित करण्याअगोदर निवडणूक आयोगानी ते अगोदर मागवून घ्यावेत. ते तपासावेत, त्याच्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करावी आणि त्यांची कमिटमेंट घेऊन मग ते जाहीरनामे प्रसिद्धीला द्यावेत आणि ते प्रसिद्ध केल्यानंतर त्या जाहीरनाम्यातील मुद्दे पूर्ण केले नाहीत म्हणजे ७० टक्के मुद्दे पूर्ण केले नाहीत तर त्या पार्टीला किंवा त्या गटाला पुढच्या निवडणुकीमध्ये उभे राहण्यास मज्जाव करावा असा क्रांतिकारक निर्णय सहारिया साहेब घेणार असतील तर त्याचे स्वागत आहे, असेही पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदांमध्ये सर्व पक्ष जेवढं जमेल तेवढंच बोलतील त्यामुळे सहारिया यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करतो. त्यांनी ते ताबडतोब शेवटच्या स्तरापर्यंत न्यावे. आम्हा वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना बोलावून घ्यावे, आम्ही काही चांगल्या सूचना आणि अमलबजावणी कशी करायची याची माहिती देऊ, असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला.

संबंधित लेख