ईव्हीएमविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिल्लीत आंदोलन

30 Aug 2018 , 06:40:18 PM

देशभरात विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमविरोधात आवाज उठवला जात आहे. ईव्हीएम हटवण्याच्या मागणीवरून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदारांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदारांनी ईव्हीएम हटाव देश बचाव, अशी घोषणाबाजी यावेळी केली. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, खा. धनंजय महाडिक, वंदना चव्हाण, फौजिया खान उपस्थित होत्या.

ईव्हीएम विरोधात असणाऱ्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी काल निवडणूक आयोगाला भेट दिली. जवळपास १७ राजकीय पक्ष ईव्हीएमला विरोध करत आहेत. ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा या सर्व राजकीय पक्षांना संशय आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

ईव्हीएमवर बंदी घालण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निवडणुका पारदर्शक होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. निवडणूक आयोगावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि ते आम्हाला न्याय देतील असंही सुळे म्हणाल्या.

संबंधित लेख