नरेंद्र मोदींचे बेटी बचाओ; राम कदमांचे 'बेटी भगाओ?' - आ. विद्या चव्हाण

04 Sep 2018 , 11:37:05 PM

भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलीची परवानगी नसेल तरी तिला पळवून नेण्याचे आक्षेपार्ह विधान दहीहंडीच्या उत्सवात केले. हे अत्यंत निषेधार्ह विधान असून जमावापुढे असे वक्तव्य करणे चुकीचे आणि संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार विद्या चव्हाण यांनी दिली आहे.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाओ, बेटी पढाओ अशी घोषणा करत आहेत तर दुसरीकडे राम कदम त्यांच्या विपरीत जाऊन बेटी भागाओचा कार्यक्रम राबवत आहेत. राम कदम नेहमी आपण किर्तनकार असल्याचा टेंभा मिरवत असतात, आपण किती सज्जन आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या कालच्या वक्तव्यातून स्पष्ट होते की, ते किती सज्जन पुरूष आहेत, असा टोला चव्हाण यांनी लगावला. राम कदम मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहेत. वेळोवेळी ते पक्षाची भूमिका मांडत असतात. भूमिका मांडणाऱ्यांची विचारधारा अशी आहे तर पक्षाची विचारधारा कशी असेल हे यातून स्पष्ट होते, असेही त्या म्हणाल्या.

आमदार राम कदम यांची तक्रार महिला आयोगाकडे करावी लागेल. मात्र त्याचा काही उपयोग होईल असे वाटत नाही. याआधी भाजपच्या पदाधिकाऱ्याविरोधात महिलेबाबत चुकीच्या वर्तनाची तक्रार केली होती मात्र त्यावर कोणीच काही बोलले नाही. आता मुख्यमंत्री राम कदम यांच्याबाबत काय भूमिका घेतात हे पहावे लागेल, भाजपने राम कदम यांचे प्रवक्ते पद रद्द करावे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.

संबंधित लेख