बीडच्या विजयी संकल्प सभेत धनंजय मुंडे यांची तुफान टोलेबाजी

02 Oct 2018 , 11:26:10 PM

स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपाला सत्तेवर बसवण्याचे काम केले, त्यांच्या नावाने चार वर्षांपूर्वी जाहीर केलेले ऊसतोड कामगार महामंडळ कुठे आहे? मी परळीमध्ये त्याचे मुख्यालय दुर्बिण लावून शोधत असतो, असा टोला लगावत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून सरकारची पुन्हा एकदा गोची केली. बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी संकल्प सभा घेण्यात आली त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते.


ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढण्याची घोषणा करून फसवणूक करण्यात आली. जिल्ह्याला कर्जमाफी मिळाली नाही, बोंडअळीचे नुकसान मिळाले नाही, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली तरी त्याचे व्याज मात्र जिल्हा बँकेचे चेअरमन खात असल्याचा घणाघात त्यांनी केला.

जिल्ह्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, शेतकऱ्याला शेतात काही नाही, घरात काही नाही आणि सरकार फक्त घोषणा देण्याचे काम करत आहे. देशाच्या चौकीदारानेच १२५ कोटी जनतेला फसवले, आरक्षणाच्या नावावर मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला फसवले असल्याचे ते म्हणाले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये शतकासाठी जशी शर्यत असते तसेच कोणाचे शतक आधी पूर्ण होते यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची शर्यत सुरु असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला. तसेच विजयी संकल्प सभेत गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक झाले असून जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभेच्या सहाही जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा निर्धार मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित लेख