राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा, समर्थन कधीच नाही - शरद पवार

02 Oct 2018 , 11:58:53 PM

६५० कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान १६०० कोटी रुपयांना विकत घेतलेच कसे, असा सवाल उपस्थित करत राफेल प्रकरणी मोदी सरकार दोषी आहेच, त्यामुळे त्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकरणी सर्वपक्षीय, संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बीड येथे केली. तुमचे थोडेच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे सत्तेची मस्ती दाखवू नका, असा इशारा त्यांनी सरकारसह बीड जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासनाला दिला. बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. बीडच्या इतिहासात प्रथमच इतकी मोठी आणि ऐतिहासिक सभा संपन्न झाली. 

राफेल प्रकरणी पुरावा नाही म्हणून मी कोणाचे नाव घेणार नाही मात्र राफेल खरेदीची खरी किंमत देशाला समजली पाहिजे, बोफोर्सच्या प्रकरणात आरोप झाले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी त्याला सामोरे गेले. आजच्या सरकारला चौकशीची भीती का वाटते, असा प्रश्न् त्यांनी उपस्थित केला.

देशाचे पंतप्रधान मन की बात सांगतात, जन की बात मात्र सांगत नाहीत. शेतकरी, अल्पसंख्याक, तरुणांची बात मात्र ऐकून घेत नाहीत अशा शब्दांत पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाची त्यांनी खिल्ली उडविली. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आरक्षणाचे काय झाले, असा प्रश्न विचारतानाच या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाचे आवतन, जेवल्याशिवाय खरे नाही अशा शब्दात त्यांनी सरकारला टोला लगावला.  

आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे, संचालक नसतानाही आणि कर्जावर सही नसतानाही धनंजय मुंडेंना जगमित्र सुतगिरणी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना तडीपार केले जात आहे. सत्तेचा हा गैरवापर करू नका, तुमचे थोडेच दिवस उरले आहेत असा इशारा त्यांनी सरकार आणि बीडच्या जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांनाही दिला. आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट असल्याचे सांगताना त्यांना आधार देण्यासाठी आपण सरसकट कर्जमाफी केली होती, सध्याच्या सरकारला मात्र नीट कर्जमाफीही करता आली नाही. शेतकऱ्यांना आधार द्यायचा असेल तर संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणी पवार यांनी केली.


या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.  जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,  आ. जयदत्त क्षीरसागरमाजी मंत्री प्रकाशदादा सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडीत, शिक्षक आ. विक्रम काळे,  आ. सतीश चव्हाण,  माजी आ.राजेंद्र जगताप, आ.रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, माजी आ.उषाताई दराडे, माजी आ.सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक नेते संदीपभैय्या क्षीरसागर, विजयसिंह पंडित, अक्षय मुंदडा, अजय मुंडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख