गिरगाव चौपाटीचे नामकरण 'स्वराज्यभूमी' करण्याच्या आपल्या निर्णयाचा सरकारला विसर - सचिन अहिर यांची टीका

12 Feb 2016 , 07:23:20 PM


स्वातंत्र्य संग्रामातील अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या गिरगाव चौपाटीचे 'स्वराज्यभूमी' असे नामांतर केल्यानंतरही ते वापरण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी सरकारला केला आहे. 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमाच्या ठिकाणाचा उल्लेख गिरगाव चौपाटीऐवजी 'स्वराज्यभूमी' असा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही सरकार जर हट्टाने हा सोहळा घडवून आणत असेल, तर किमान या सोहळ्यात पंतप्रधानांसमोर राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य दाखवून देणाऱ्या एखाद्या ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण करावे, अशी मागणीही अहिर यांनी यावेळी केली. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अहिर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली.

मोठा गाजावाजा करून, देशाच्या आर्थिक राजधानीत कोट्यावधींची उधळण करून 'मेक इन इंडिया' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सोहळ्यादरम्यान एका लेझर शोचे आयोजनही करण्यात आले आहे. मात्र त्याच्या जाहिरातीत ठिकाणाचा उल्लेख करताना गिरगाव चौपाटी असा उल्लेख करण्यात येत आहे. वास्तविक याच सरकारने सत्तेवर आल्यावर गिरगाव चौपाटीचे स्वराज्यभूमी असे नामकरण केले होते. मात्र आपल्याच निर्णयाचा या सरकारला विसर पडला आहे का, असा सवाल अहिर यांनी केला आहे. ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे, फक्त तोच परिसर स्वराज्यभूमी या नावाने ओळखला जातो. त्यामुळे नेमके तथ्य काय आहे याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तसेच राज्यातील दुष्काळाचे सरकारला काहीच सोयरसुतक नसल्याची टीकाही अहिर यांनी केली आहे. आता किमान 'मेक इन इंडिया' या सोहळ्याचा वापर करून आपले म्हणणे पंतप्रधानांसमोर मांडण्याची नामी संधी राज्य सरकारला आली आहे. उदघाटन सोहळ्यादरम्यान राज्याच्या दुष्काळाची वस्तुस्थिती कथन करणारी एखादी चित्रफित पंतप्रधानांना दाखवावी, म्हणजे तरी केंद्र सरकारकडून काही मदत मिळवता येईल, अशी सूचनाही अहिर यांनी सरकारला केली आहे. या सर्व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


संबंधित लेख