गोपाळ शेट्टींचे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे - नवाब मलिक

18 Feb 2016 , 06:34:30 PM


'मेक इन इंडिया' कार्यक्रमासंदर्भात सरकार करत असलेले दावे, शेतकरी आत्महत्त्यांबद्दल भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी केलेले वादग्रस्त वक्तव्य यांसारख्या विविध मुद्द्यांवर मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आज राष्ट्रवादी भवनातील पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरले. 

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत देण्यासाठी सध्या स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी शेतकरी आत्महत्या करत आहेत. ती एक फॅशन झाली आहे असे वक्तव्य भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार हल्ला चढवला. 'पैशासाठी कोणी आत्महत्या करत नाही. सर्व शेतकरी जर पैसे देणार असतील, तर शेट्टी आत्महत्या करतील का?' असा खोचक सवाल मलिक यांनी केला. 'शेट्टी यांनी आपल्या आत्महत्त्येची किंमत सांगावी, सर्व शेतकरी मिळून त्यांना ही रक्कम देतील.' असा टोला मलिक यांनी शेट्टी यांना लगावला. भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष असल्याचे शेट्टी यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून त्यांचा खरा चेहरा समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळा मुळे तब्बल ३ हजार २०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा वेळी शेट्टी यांनी केलेले वक्तव्य हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी भाजपने सार्वजनिक माफी मागावी किंवा शेट्टी यांची पक्षातून हाकालपट्टी करावी अशी मागणी मलिक यांनी केली.


भाजपने अमिर खानला देशभक्त म्हणून दाखला कधी दिला ?

जलयुक्त शिवारचा ब्रँड अम्बेसिडर म्हणून राज्यातील भाजप सरकारने अमिर खान याची निवड केली आहे. काही दिवसांपूर्वी अमिर खान याने असहिष्णुतेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी त्याला 'देशद्रोही' म्हणतत त्याला पाकिस्तानमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. पण आता अचानक भाजप सरकारनेच अमिरला ब्रँड अम्बेसिडर केले आहे. त्यामुळे अमिरला भाजपने देशभक्त असल्याचा दाखला कधी दिला अशी विचारणा नवाब मलिक यांनी केला आहे. 
पत्नी किरण राव हीला देशात सुरक्षित वाटत नसून तीचा देश सोडण्याचा विचार आहे असे वक्तव्य अमिर खानने एका कार्यक्रमात केले होतो. त्यानंतर देशभरातून भाजप नेत्यांनी अमिरवर टीकेची झोड उठवली होती. त्यात भाजप खासदार मनोज तिवारी यांनी अमिर गद्दार असल्याचे म्हटले होते. तर खासदार स्वामी आदित्यनाथ यांनी अमिरला पाकिस्तानला जाण्याचा सल्ला दिला होता. तर स्वाध्वी प्राची यांनी अमिर पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, इराण कुठे जाणार सांग तिकीट पाठवून देतो असे वक्तव्य केले होते. शहानवाज हुसेन आणि अनुपम खेर यांनी तर अमिर विरोधात आघाडीच उघडली होती. असे असताना अचानक हा बदल कसा काय. आता भाजपने अमिरला देशभक्तीचा दाखला देऊ केला आहे का असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला.


शिवस्मारकाच्या कामाला कधी सुरुवात होणार ?

शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापेक्षा ते सरकारी जीआर मध्ये अडकून पडले आहे असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांना कार्यालय आणि गाडी देऊन स्मारक उभे रहाणार नाही अशी टीकाही त्यांनी केली. मागिल शिवजयंतीला भूमिपूजन करणार असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात भूमिपूजन झाले नाही. त्यामुळे आत्ता तरी स्मारकाच्या कामाला कधी सुरूवात होईल हे सरकारने स्पष्ट करावे असे आवाहन त्यांनी केले 

स्मारकासाठी कोणत्या एजन्सीची नियुक्ती केली आहे. सध्या त्याची काय स्थिती आहे. निविदा प्रक्रिया कुठपर्यंत आल्या आहेत अशी विचारणाही मलिक यांनी केली. सरकार केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

या पत्रकार परिषदेस नवाब मलिक यांच्यासह गटनेते माजी मंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, संजय तटकरे आणि क्लाइड क्रास्टो उपस्थित होते.

संबंधित लेख