खासदार गोपाळ शेट्टींविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करा

19 Feb 2016 , 06:15:06 PM

आत्महत्या करणे ही फॅशन झाली आहे असे वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखव करावा, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्याबाबतचे निवेदन उत्तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली कांदिवली पोलिसांना देण्यात आले. त्या आधी शेट्टी यांच्या कांदिवली येथील कार्यालयाबाहेरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत आपला निषेध नोंदवला. यावेळी सोहेल सुभेदार, अशोक पराडकर, सोनल पेडणेकर, तृप्ती मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

आत्महत्येला फॅशन म्हणणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. असे वक्तव्य करून शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप इंद्रपाल सिंह यांनी केला आहे. शेट्टींच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेलाही बाधा पोहचली आहे. त्यामुळे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी सिंह यांनी केली. शेट्टी आत्मत्येला फॅशन म्हणत असतील तर त्यांनीही आधी ही फॅशन करून दाखवावी, असेही ते म्हणाले.

संबंधित लेख