डिजिटल इंडिया चा गजर करतांना ‘अस्वस्थ’ भारताची केंद्राने दखल घ्यावी- सुप्रिया सुळे

02 Mar 2016 , 08:46:15 PM

 ‘डिजिटल इंडिया’ असा नारा लावत असतांना असा अस्वस्थ ‘भारत’ आपण पुढच्या पिढीस दाखवत आहोत ही अत्यंत खेदाची बाब असल्याची टीका खासदार सौ.सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत केली. ‘मेक इन इंडिया’, निव्वळ उद्योगधंदे, तंत्रज्ञान याच्यापुरता सीमित नसून त्यात ‘शेतकरी’ ही समाविष्ट आहे. रोहित वेमुला, जेएनयु यासारख्या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे युवावर्गात अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवी आहेत, महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्येची घटना घडल्यावर कलम ३०२ लावण्याची भाषा अनेक भाजप नेते करत होते, आज ते कुठे आहेत. आज महाराष्ट्रातील सरकार काय करत आहे. या आत्महत्यांचे राजकारण करण्याच्या मी विरोधात आहे, या प्रश्नावर एकत्रितपणे काम करण्याची, उपाययोजना करण्याचीही गरज आहे. परंतु राजकीय टीका करतांना ती आपल्यावरही उलटू शकते याचे भान विरोधकांनी राखावे अशी खरमरीत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरु असलेल्या चर्चेत आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चालू घडामोडींवर भाष्य करतांना सरकारच्या विविध धोरणांचा समाचार घेतला. रोहित वेमुला प्रकरणात जे घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचे पडसाद सगळीकडे उमटले, त्यावर चर्चाही झाली परंतु पुढे काय. त्याच्या आईला ज्या यातना झाल्या असतील त्याची कल्पना एक ‘आई’च समजू शकते. त्याचे कुटुंब आज कोणत्या परिस्थितीत आहे याची किती जणांना कल्पना आहे, चर्चा करून विषय संपवला जातो पण त्याचा समाजावर काय परिणाम होतो याचा सरकार नक्की विचार करत आहे का, आजच्या युवांमधली अस्वस्थता समजून घेण्याचा प्रयत्नतरी होतोय का असा सवालही त्यांनी यावेळी केला. लातूरमध्ये शिवजयंतीच्या वेळी पोलीस कर्मचाऱ्याबरोबर घडलेली घटना, ठाण्यातील महिला वाहतूक पोलिसास झालेली मारहाण याबाबत मौन बाळगून सरकार याचे समर्थन करत आहे ही गंभीर बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, मोठमोठे इव्हेंट करून उद्योगधंदे, गुंतवणूक वाढविण्याबाबत सरकार प्रयत्न करत आहे ही चांगली बाब आहे. यानिमित्ताने राज्याराज्यात निकोप स्पर्धा होईल, पण व्यापार वाढवावा कसा, उद्योग यांचे महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला परदेशी तज्ञांची गरज लागते, आपण त्यांचे मत अधिक ग्राह्य धरतो, केंद्राने एकदातरी स्थानिक उद्योजकांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याची माहिती घेतली आहे का? त्यांना कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेतले आहे का? त्यांना काय सुधारणा हव्या  आहेत हे बघितले जाते  का असा सवालही त्यांनी सरकारला केला. पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड ही स्मार्ट सिटी च्या स्पर्धेतली १२ प्रमुख शहरांपैकी ३  शहरे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली विकास साधत आहेत याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. त्या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी आमचे स्थानिक नेतृत्व प्रयत्न करत आहे असे त्यांनी सांगितले, परंतु स्मार्ट सिटी या संकल्पनेत संपूर्ण शहराचा विकास अभिप्रेत नाही तर फक्त ठराविक भागाचा विकास आहे. सध्याचे सरकार यूपीएच्याच जुन्या योजना नव्या नावाने राबवून समोर आणते आहे, त्यांचा पुरस्कार केला जातो आहे,  मनरेगा, आधार कार्ड हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

संबंधित लेख