शेतकरी मोडला तर राज्य मोडेल - अजित पवार

10 Mar 2016 , 07:55:25 PM

शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. बळी राजाला वाचवण्याची गरज आहे. बळी राजा नष्ट होणे राज्याला परवडणारे नाही त्यामुळे तातडीने पाऊले उचला नाही तर भयंकर परिणाम होतील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारला दिला. त्यावर तातडीची उपाय योजना म्हणून कर्जमाफी, वीज बील माफी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना महिन्याला तीन हजार रूपये पेंशन सुरू करावी, त्याच बरोबर फक्त परिक्षा शुल्क माफी नको तर संपुर्ण फी माफी विद्यार्थ्यांची केली जावी अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली. दुष्काळावरील चर्चेवेळी ते बोलत होते. 

 यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी सरकारवर सडकून टीका करत सरकारच्या कारभाराची चिरफाड केली. विजय मल्ल्या ९ हजार कोटी रूपये बुडवून परदेशात पळाला तर भाजप सरकारने व्होडाफोनचे ३ हजार कोटी माफ केले. हे पैसे दुष्काळग्रस्तांसाठी वापरले असते तर दुष्काळ निवारणासाठी मदत झाली असती. पण तशी मानसिकता या सरकारची नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. या व्यापारी आणि उद्योगपतींचा पुळका आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे नाही असा आरोप त्यांनी केला.  एेन वेळी दुष्काळी भागाच दौरा करून प्रश्न सुटणार नाहीत. दुष्काळी भागातल्या पालकमंत्र्यांनी तर टंचाईच्या बैठकाही घेतल्या नाहीत. मंत्र्यांचे पीए दुष्काळ दौऱ्यावर शेतकऱ्यांनाच मारत सुटले आहेत. एेवढी मस्ती आली कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कायमची सत्ता घेवून तुम्ही आला नाहीत. सत्ता आज आहे उद्या नाही. सत्तेत असताना पाय जमिनीवर ठेवा. सत्तेची मस्ती डोक्यात जावू देवू नका असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. मंत्र्यांचे अधिकारी एेकत नाहीत असे असेल तर त्या अधिकाऱ्यांची जागा त्यांना दाखवून द्या. आता तुम्ही विरोधात नाही तर सत्तेत आहात याचे भान ठेवा असेही पवार यांनी यावेळी सांगितले. हे सरकार कसे नियोजन शुन्य आहे याचीही पोलखोल अजित पवार यांनी केली. लातूर मध्ये मोठी पाणी टंचाई आहे. याची कल्पना सरकारला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्या होती. सध्या जायकवाडीत २ टक्के पाणी शिल्लक आहे. आता सरकार काय करणार आहे. सरकारचे काही नियोजनच नाही. 

जनावरांचा आणि चारा छावण्यांचा विषय गंभिर आहे. उस्मानाबाद मध्ये तब्बल ३ लाख जनावरे आहेत. त्या पैकी केवळ ८२ हजार जनावरे चाराछावण्यात आहेत. बाकीच्या जनावरांचे काय असा प्रश्न त्यांनी सरकारला केला. मुख्यमंत्र्यांनी भूम परांड्यात चारा छावणी सुरू करण्याचे आदेश डिसेंबर मध्ये दिले होते. पण अजूनही छावणी सुरू झालेली नाही हा काय प्रकार आहे असा प्रश्न त्यांनी सरकारा केला. 

  दुष्काळाची स्थिती गंभिर आहे. अर्धा महाराष्ट्र त्यात होरपळला जात आहे. शेती होत नाही, शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत, हाताला काम नाही जनावरांना चारा नाही त्यामुळे एका वेगळ्या संकटात बळीराजा सापडला आहे.  त्यात जलयुक्त शिवार केले जात आहे. ते सरकारने करावे पण पाऊसच पडला नाही तर या जलयुक्त शिवारचा काय उपयोग अशी विचारणा त्यांनी यावेळी केली. सध्या दुध उत्पादक मोठ्या अडचणीत आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सरकारने गेल्या दिड वर्षात काही पाऊले उचलेली नाहीत. हे दुभळे सरकार असून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात नाही. गो वंश बंदी केली गेली. त्यानंतर गो शाळा काढण्याचे खडसेंनी सांगितले. कुठे आहेत या गोशाळा असा प्रश्नही त्यांनी खडसे यांना केला. नुसते बोलत जावून का....नुसते बोलणे आणि कृती करणे यात फरक आहे असा टोला त्यांनी खडसेंना हाणला. चुकीच्या गोष्टी आणि घोषणा करून वेळ मारून नेवू नका, माणुसकीच्या भावनेतून निर्णय घ्या. 
  
पाण्याचे टँकर बाबत राज्याचे मुख्यमंत्रीच खोट बोलत आहेत. सर्व अधिकार खाली दिले असून मागेल त्या टँकर मिळेल असे ते सांगत आहेत. प्रत्यक्षाच पाच पाच पानी अर्ज आणि प्रमाणपत्रा शिवाय पुढची प्रक्रीयाच होत नसल्याचे अजित दादा यांनी सभागृहात कागदोपत्रासह दाखवून देत मुख्यमंत्र्यांना लक्ष केले. मुख्यमंत्री एक बोलतात आणि अधिकारी दुसरा निर्णय घेतात. अधिकारीच ह्यांचे एेकत नसेल तर कसे काय होणार. सर्व गोष्टींचा विचार करा नाहीतर हे पाप कुठेच फेडता येणार नाही असे ते म्हणाले. 

 चारा छावण्या बंद करण्याचा रझाकारी निर्णय या सरकारने खुशाल घेतला . हा निर्णय कोणाच्या सांगण्या वरून घेतला अशी विचारणाही पवार यांनी केली. चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांची चेष्ठा करणारा होता असा आरोपही पवार यांनी केला. आता अध्यक्षांनी सरकारला निर्देश द्यावे. तातडीने पाऊले उचलावीत. बळीराजाला वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे त्यात कुणी राजकारण करू नये असेही ते यावेळी म्हणाले.

संबंधित लेख