शेतकरी आणि सामान्यांना कसलाही दिलासा नसलेला राज्याचा अर्थसंकल्प

19 Mar 2016 , 02:03:38 AM

राज्याच्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्रासाठी २५ हजार कोटींची भरीव तरतूद केल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात शेतकरी आणि सामान्यांना कसलाही दिलासा अर्थसंकल्पातून मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून आर्थिकदृष्ट्या दिशाहीन असणारा असा हा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले. तसेच  आजपर्यंत अर्थसंकल्प सादर झाल्यावर दुसऱ्या मिनिटाला अर्थमंत्र्यांच्या भाषणाची कॉपी सदस्य आणि पत्रकारांना मिळत असे, मात्र यावेळी कॉपी मिळण्यास उशीर झाला. विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पाची चिरफाड करू नये, म्हणूनच कॉपी उशीरा दिली जात आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने पाटील यांनी उपस्थित केला. गतवर्षी अर्थसंकल्पात शेतीचा विकास दर ६ टक्के इतका सांगितला होता. मात्र यावर्षीच्या अर्थसंकल्पात तो २.७ टक्के इतका कमी आहे. तसेच गतवर्षीच्या अर्थसंकल्पात ज्या घोषणा केल्या होत्या त्याचीही तरतूद या अर्थसंकल्पात नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले. 

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील अर्थसंकल्पाबाबात नाराजी व्यक्त केली. हा तर आकड्यांची जगलरी करणारा अर्थसंकल्प आहे, सामान्यांच्या व ग्रामीण जनतेच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत, असे मुंडे म्हणाले. महाराष्ट्रच्या प्रगतीला खीळ घालणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे. शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अर्थसंकल्प सुरु केला आणि शिवस्मारकाला व बाळासाहेबांच्या स्मारकासाठी काही तरतूद केली नाही, असेही मुंडे म्हणाले. 

तर, अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 25 हजार कोटींची तरतूद केली, पण त्याचा कोणताही हिशोब अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे हा फसवा अर्थसंकल्प असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले. संबंधित लेख