व्यापारी, उद्योगपतींकडे लक्ष देण्याऐवजी तळागाळातील उपेक्षित घटकांकडे लक्ष द्या - दिलीप वळसे पाटील

04 Apr 2016 , 10:08:34 PM

सरकारने व्यापारी, उद्योगपती, मोठे बागायतदार यांच्यावर अधिक लक्ष देण्यापेक्षा राज्यातील उपेक्षित, वंचित समाजावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, असे मत माजी विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले. अर्थसंकल्पातील सामाजिक न्याय विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. 


राज्यातील समाजिक न्याय विभागाचे काम समाधानकारक नसल्याचा आरोप यावेळी वळसे पाटील यांनी केला. सामाजिक न्याय विभागासाठी गेल्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या निधीपैकी तब्बल ५० टक्के निधी खर्चच करण्यात आलेला नाही. हा निधी खर्च झाला नाही तर डोंगर-दऱ्यांमध्ये, राज्याच्या दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या वंचित समाजाला न्याय मिळणार नाही. या वर्गाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाचीच आहे, असे मत वळसे पाटील यांनी व्यक्त केले. आदिवासी विकास विभागाचीही काही वेगळी स्थिती नाही. मंजूर झालेला निधी पूर्णपणे आदिवासी समाजाच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे असेही ते म्हणाले. मात्र या विभागाला गतवर्षीचे पैसेही खर्च करता आलेले नाहीत. त्यामुळे हे पैसे योग्य पद्धतीने कसे खर्च होतील हे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्या योजनांना प्राधान्य क्रम द्यायचा याचा निर्णय घ्या, तसे केले तर या समाजातील लोकांना न्याय देता येईल.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांना अभिप्रेत असलेली समाज कल्याणाची संकल्पना प्रत्यक्षात आणा. या समाजाचे आर्थिक जीवन सुखी आणि आनंदी करा, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले. 


निव्वळ कोंबड्या वा शेळ्या वाटप योजनांनी काही होणार नाही. आदिवासी कुटुंबे मोठी होणार नाहीत. त्यांच्या शैक्षणिक सुविधा, आरोग्य, रोजगार यावर अधिक लक्ष केंद्रीत करा, त्यांना रोजगाराची हमी द्या, असे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले. सामाजिक न्याय विभागात सावळा गोंधळ सुरू आहे. अनेक योजना या लाभार्थींपर्यंत पोहचतच नाहीत, असा आरोप त्यांनी केला पूर्वी देशादेशात लढाई होत होती. आता न्याय्य हक्कांसाठी राज्या राज्यात लढाई सुरू झाली आहे. ती आता जिल्ह्यानंतर तालुका आणि नंतर गावांपर्यंत येऊन पोहचेल. त्यामुळे सर्वसामान्य समाजातील घटकांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे या दृष्टीने सरकारने पाऊले उचलावीत. समाजातील शेवटच्या वंचित घटकाला समृद्ध करण्याचे प्रयत्न करा, असे वळसे पाटील यांनी सांगितले.  

संबंधित लेख