औषध खरेदी घोटाळ्याची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा - राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी

13 Apr 2016 , 03:08:50 AM

मुंबई : आरोग्य विभागात झालेल्या २९७ कोटींच्या औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींमार्फत केली जावी अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केली. या वेळी त्यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना लक्ष्य करीत त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मर्जीतल्या कंत्राटदारांना मदत होण्याच्या दृष्टीनेच हे सर्व व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 

आरोग्यविभागात खरेदी घोटाळा झाल्याची बातमी समोर येताच दोन अधिकाऱ्यांना कोणतीही चौकशी न करता त्यांना थेट निलंबित करण्यात आले याचा अर्थ या विभागात घोटाळा झाला हेच सिद्ध होते, असे पाटील म्हणाले. औषध खरेदीत स्वत:च्या मर्जीतल्या ठेकेदारांना फायदा होण्यासाठी निविदा आणि निविदापद्धती कशा बदलण्यात आल्या हेही त्यांनी पुराव्यासह सभागृहात सांगितले. औषधांची मागणी नसताना भरमसाठ औषधे पाठवली गेली, तेव्हा त्या त्या नगरपालिकांनी एवढ्या औषधांची गरज नसल्याचे आरोग्य विभागाला कळवले. एवढेच नाही तर ही औषधे परत घेऊन जावीत असाही पत्रव्यवहार झाला, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली.

ते म्हणाले, काही ठिकाणी जबरदस्तीने  औषधे पाठवण्यात आली व ती वापराविना पडून राहिली. बाजारात २० रुपयांना मिळणारे मधुमेहावरील औषधाच्या गोळ्यांचे पाकीट ३४ रुपयांना घेण्यात आले. मधुमेहाच्या प्राथमिक टप्प्यावरील उपचारांच्या औषधांची खरेदी आवश्यक असताना चौथ्या टप्प्यावर  लागणाऱ्या औषधाची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे मधुमेहावरच्या गोळ्या बाजारात फक्त ५० पैसे किंवा एक रुपयाला उपलब्ध आहेत. या गोळ्यांचा जवळपास ७० ते ८० टक्के रुग्णांना फायदा होतो. पण आरोग्य विभागाने आपल्या मर्जीतील लोकांना खुश करण्यासाठी हे सर्व केले.

मुंबईपुण्यासारख्या मोठ्या शहरांपेक्षा अकोला जिल्ह्यात कोट्यवधींचा औषधपुरवठा मागणी नसताना करण्यात आला. मलेरियाच्या तब्बल २ लाख ८३ हजार गोळ्या अकोल्याला पाठवण्यात आल्या तर पुण्याला फक्त चार हजार गोळ्या देण्यात आल्या अशी माहिती देऊन, लोकसंख्येच्या प्रमाणात औषधांचा पुरवठा केला जातो याची आठवण पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना करून दिली.

मीरा-भाईंदर महापालिकेला आयोडीनच्या ६० बाटल्यांची आवश्यकता असताना तब्बल ७० हजार आयोडीन बाटल्यांचा पुरवठा करण्यात आला.  बरीच औषधे अप्रमाणित व नित्कृष्ट दर्जाची होतीअसे आढळल्यावर ती परत घेण्यासंबंधी कंपन्यांना केवळ विनंतीपर पत्रे पाठवण्यात आली. आरोग्य विभागाने औषध प्रशासन विभागाकडे त्यांची तक्रार केली नाही, याकडे लक्ष वेधून सर्वसामान्यांच्या आरोग्यबरोबर खेळण्याचा हा प्रकार आहे, असा आरोपही त्यांनी केला. ही बाब गंभीर असल्याने निवृत्त न्यायमूर्तींमार्फत प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार पाटील  यांनी केली.

मुख्यमंत्री तुम्हाला क्लीन चिट देणार नाहीत. तुम्ही शिवसेनेचे आहात. क्लीन चीट फक्त भाजपच्या मंत्र्यांसाठी आहे असा चिमटाही जयंत पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना काढला.

संबंधित लेख