मुंबईतील रस्ते भ्रष्टाचाराची चौकशी एसआयटी मार्फत करा - सचिन अहिर

03 May 2016 , 05:32:33 PM

मुंबई महापालिकेमार्फत तयार करण्यात आलेल्या ५५४ रस्त्यांच्या कामात हजारो कोटींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत केली जावी, अशी मागणी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sachin Ahir यांनी केली. शिवाय जे कंत्राटदार यात दोषी आढळले आहेत त्यांना तातडीने अटक करून त्यांची ब्रेन मँपिंग टेस्ट करावी अशी मागणी ही अहिर यांनी केली. आज महापालिकेबाहेर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्ताधारी शिवसेना भाजप विरोधात निदर्शन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आमदार राहुल नार्वेकर, महापालिकेतील गटनेते धनंजय पिसाळ, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, राष्ट्रवादी मुंबई युवती अध्यक्ष अदिती नलावडे, हारुन खान, सुनिल अहीर, बबन कनोजे, अजित रावराणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निदर्शनानंतर महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना या प्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन गटनेते धनंजय पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

महापालिका आयुक्तांनीही भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले, त्यामुळे सत्य मुंबईच्या जनतेपुढे आले आहे असे अहिर यावेळी म्हणाले. सध्या फक्त ३२ रस्त्यांचा अहवाल आला आहेत. या रस्त्यांच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबईतल्या सर्व ५५४ रस्त्यांच्या कामाची चौकशी झाली पाहीजे, असे अहिर म्हणाले. हा ३०० ते ४०० कोटींचा भ्रष्टाचार नसून हजारो कोटींचा भ्रष्टाचार आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा घोटाळा सुरू असल्याचा आरोपही अहिर यांनी केला. निविदा प्रक्रिया कशा पार पडल्या, निविदा कशा पद्धतीने देण्यात आल्या, जे कंत्राटदार यात दोषी म्हणून समोर आले आहेत त्यांना अटक का झाली नाही असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. त्यामुळे याप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहीजे तसेच या सर्व कंत्राटदारांना अटक करून त्यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या सर्व घोटाळ्याला राजकीय वरदहस्त आहे. महापौरांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पक्षातील लोकांनीच त्या बाबत नाराजी व्यक्त केली. महापौर आणि स्थायी समिती यांच्यातील अंतर्गत भांडणामुळे हे प्रकरण पुढे आहे आहे असा आरोपही अहिर यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांनी राजिनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या प्रकरणात अजून कोणी मोठे मासे आहेत का ते पुढे समोर येईल, असेही अहिर म्हणाले.

संबंधित लेख