'दुष्काळ परिषदे'च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १५ हजार रूपयांची मदत

05 May 2016 , 11:34:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे १६ मे रोजी दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दुष्काळ परिषदेत औरंगाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 'राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या' माध्यमातून १५ हजार रूपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. आज राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, मुंबई प्रदेश प्रवक्ते हेमराज शहा, संजय तटकरे, क्लाईड क्रास्ट्रो उपस्थित होते. 

मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दुष्काळ दौरा करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार हे शुक्रवार, ६ मेपासून दोन दिवसांचा मराठवाडा दौरा करणार असल्याची माहितीही मलिक यांनी यावेळी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना व औरंगाबादचा दौरा करणार आहेत. त्याच बरोबर आ.शशिकांत शिंदे, आ. राजेश टोपे, माजी मंत्री मनोहर नाईक, अनिल देशमुख, रमेश बंग, जयप्रकाश दांडेगावकर हेदेखील दुष्काळ दौऱ्यात सहभागी होतील, असे मलिक यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दुष्काळी दौरे १५ मे पर्यंत चालणार असून त्यानंतर १६ मे रोजी औरंगाबाद येथे पक्षातर्फे दुष्काळी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेनंतर मराठवाड्यातील उर्वरीत ७ जिल्ह्यातही अशाच पद्धतीने दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख