शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत न्यायालयाच्या सूचनेचे सरकारने पालन करावे - शंकरअण्णा धोंडगे

13 May 2016 , 10:21:38 PM

शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी-शेतमजूर कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत न्यायालयाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशाची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी व शेतमजूरांना पेन्शन, मनरेगाची अंमलबजावणी यासारख्या मागण्या सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना दुष्काळी भागातील शेतकऱ्याचे पीककर्ज केंद्रसरकार आणि राज्य सरकारने माफ करावे, पेरणीसाठी बी-बियाणे व खते सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, मनरेगा अंतर्गत शेतकरी शेतमजूरांना गावातच कामे उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. या सूचनांचे पालन सरकारने केलेच पाहीजे असे शंकर अण्णा धोंडगे यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांबाबत द्वेषभावना न ठेवता राज्यकर्ते म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून शेतकऱ्यांचा सन्मान राखावा अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित लेख