दुष्काळ परिषदेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना राष्ट्रवादीचा मदतीचा हात

17 May 2016 , 06:12:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवारी औरंगाबाद येथे दुष्काळ परिषद पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील १४६ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येकी १५ हजार रूपयांची मदत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पवार चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने विद्यार्थी सहाय्यता निधीचे वाटपही यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर यशस्विनी सामाजिक अभियानच्या माध्यमातून महात्मा गांधी मिशन हेल्थ कार्डचे वाटपही २०० महिलांना करण्यात आले. यावेळी बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका करत सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर ५ जूनला रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

जे सरकार साधं पाणी आणि चारा देऊ शकत नाही त्यांना खुर्चीवर बसण्यासाठी शरम वाटली पाहीजे, अशी जोरदार टीका शरद पवार यांनी यावेळी केली. सरकारची शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत नाही असेही पवार म्हणाले. मोदींच्या अच्छे दिनच्या भूलथापांना सर्वजण भूलले पण आता एकदा चुक झाली आहे आता पुन्हा तसे करू नका, या सरकार विरोधात सर्वांनी एकजूट व्हा आणि या सरकारला धोपटून काढा. राज्यसरकार आणि केंद्रसरकारला आपण थोडा वेळ देऊ, मात्र या कालावधीत संपूर्ण कर्जमाफी, विद्यार्थ्यांची शुल्कमाफी, गुरांना चारा, पीक कर्ज, बी बीयाणे पुरवले नाही तर या सरकारविरोधात ५ तारखेला रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन त्यांनी जनतेला यावेळी केले. सरकार जरी बघ्याची भूमिका घेत असले तरी खचून जाऊ नका, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका लोकशाहीच्या मार्गाने या सरकारला त्यांची जागा दाखवा, असेही त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

यावेळी बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. दोन वर्षांपूर्वी १६ मेला केंद्रात पंतप्रधान मोदींचे सरकार अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. पण दोन वर्षानंतर काय स्थिती आहे? अच्छे दिन आले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे १६ मे हा विश्वासघात दिन ठरला आहे अशी टीका मुंडे यांनी केली. तर मराठवाडा हा आता टँकरवाडा आणि स्मशानवाडा झाला असल्याची उपरोधिक टीका आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात, हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे त्यांना शेतकऱ्यांचे काही पडले नाही असे टीकास्त्र सरकारवर सोडले. दुष्काळाबाबात न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. शेतकऱ्यांना न्याय देण्याची दानत या सरकारमध्ये नाही असेही ते म्हणाले. पाण्यासाठी मराठवाड्यात ५० मुलांचा मृत्यू झाला. त्यात २० विद्यार्थी आहेत. पण त्याचे गांभीर्य सरकारला नाही, असा आरोप पाटील यांनी केला. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात सरकारला कर्ज माफी करावीच लागेल, त्यांना कर्जमाफी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस भाग पाडेल असा इशारा दिला. राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. हे सरकार झोपेंचे सोंग आणत आहे. त्यांना जागं करण्यासाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही, मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या करणार नाही असा निर्धार करावा असे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले.

दरम्यान आमदार सतिश चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या सुरूवातीला मा. शरद पवार यांना शेतकऱ्यांचे आसूड हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. विधिमंडळ नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गटनेते जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, पद्मसिंह पाटील, राजेश टोपे, आ. जयदत्त क्षीरसागर, भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान व प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या दुष्काळ परिषदेस उपस्थित होते.

संबंधित लेख