खा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उठविला कोपर्डी प्रकरणावर आवाज

20 Jul 2016 , 07:01:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत कोपर्डी, अहमदनगर येथे घडलेल्या घटनेवर आवाज उठविला. संसदेच्या शून्य काल प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून अत्यंत निर्घृण पद्धतीने तिचा खून करण्यात आला ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे असे त्या म्हणाल्या. दोन दिवस मुलीचे कुटुंबीय तिला शोधत होते, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घटना समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली ही खेदाची बाब असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले.
दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर सगळ्या देशाने एकजुटीने येऊन कडक कायदा संमत केला. पण आजही समाजाची मानसिकता बदलण्यात आपण अपयशी ठरलो आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हरियाणाची मुलगी असो वा महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातली ती सुरक्षित नाही हे वास्तव आहे. आपण एकजुटीने येऊन कठोरात कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवली जाऊन अत्यंत कठोर शासन आरोपींना सर्वांसमक्ष द्यायला हवे. कायद्याची जरब अशारितीने बसली तर गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल असेही त्या म्हणाल्या.
कोपर्डी मधल्या मुली आज भयभीत झाल्या आहेत. आज तिथली मुलगी शाळेत जायलाही घाबरते आहे हे चित्र बदलायला हवे. स्त्री सक्षमीकरणाबद्दल बोलत असताना स्त्रियांना निर्भयपणे वावरण्यासाठी तसा समाज तयार होणेही तितकेच गरजेचे आहे. असे वातावरण त्यांना देणेही महत्त्वाचे असल्याचे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. स्थानिक प्रशासनासही जास्तीचे अधिकार दिल्यास गुन्हेगारांना जरब बसण्यास मदत होईल असा मुद्दाही सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना मांडला.⁠⁠⁠⁠

संबंधित लेख