राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई युवक अध्यक्षपदी अॅड.निलेश भोसले यांची निवड

08 Sep 2016 , 09:10:25 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई युवक अध्यक्षपदी अॅड.निलेश भोसले यांची निवड  झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष आ. निरंजन डावखरे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली. 

यावेळी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा देत मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुढील महिन्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार आहे, त्यामुळे युवक संघटनेने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले. तसेच लवकरच युवक कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करत मुंबईत महानगरपालिकेतील सेना-भाजपच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करण्यासाठी युवक संघटनेने रस्त्यावर उतरून काम केले पाहीजे, त्यादृष्टीने पक्षबांधणी सुरू करा, पक्ष अधिक बळकट करा, अशा सूचना केल्या.

आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने माझ्याकडे मुंबई युवक अध्यक्ष ही महत्त्त्वाची जबाबदारी सोपवली आहे, ही जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया यावेळी अॅड.निलेश भोसले यांनी दिली. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुंबईतील सर्व तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्षांची नेमणूक करून संघटना बांधणीचे काम पूर्ण करण्याची ग्वाहीही भोसले यांनी दिली.

संबंधित लेख