साखर उद्योगासमोरील समस्यांबाबत माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांचा पुढाकार

12 Sep 2016 , 06:22:53 PM

राज्यातील साखर उद्योगासमोरील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष व आमदार दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे संचालक शिवाजी पाटील, श्रीराम शेटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन,सहकार विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू,साखर आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि साखर कारखान्याचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांनी साखर उद्योगासमोरील समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडून काही मागण्या केल्या. केंद्र सरकारने स्टॉक लिमिटच्या बाबतीत सप्टेंबर अखेरपर्यंत ३७ टक्के व ऑक्टोबर अखेरपर्यंत २४ टक्के पेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही, अशा आशयाचे निवेदन काढले आहे. त्यामुळे साखरेचे भाव सरासरी १०० ते २०० रुपयांनी पडल्याचे त्यांनी सांगितले.
सन २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीसाठी ऊस खरेदी कर माफ करण्यात यावा, राज्यातील साखर उद्योगाच्या कर्जाची पुर्नरचना करणे, सहवीज निर्मिती प्रकल्पाचे वीज खरेदी करार करणे, शासकीय देणी प्रलंबित ठेवणे, शासकीय विनाअट थकहमी मिळणे, सॉफ्ट लोन मिळणे तसेच इथेनॉल वरील वाशी, नवी मुंबई व मिरज डेपो वरील स्थानिक संस्था कराचा संबंधीचे प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले.
राज्यातील साखर कारखान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करू तसेच हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्य शासनामार्फत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

संबंधित लेख