मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत - नवाब मलिक

17 Oct 2016 , 05:15:22 PM

ईबीसीसाठीच्या सहा लाख मर्यादेचे आम्ही स्वागत करतो, मात्र याचा लाभ फक्त २०-२५ टक्के विद्यार्थ्यांनाच होणार आहे, मग उर्वरीत विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मलिक यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. सहा लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना खाजगी, विनाअनुदानित संस्थेत या सवलतीचा लाभ मिळणार आहे काय? असा सवालही यावेळी मलिक यांनी केला. जर असा निर्णय झाला नसेल तर मुख्यमंत्र्यांनी सर्व खाजगी व विनाअनुदानित संस्थेसाठी सरसकट सवलत देण्याचा निर्णय घ्यावा, असेही ते पुढे म्हणाले. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो व संजय तटकरे उपस्थित होते.
मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास आज राज्य सरकारने आणखी वेळ मागितला प्रतिज्ञापत्र तयार असून त्याची फेरतपासणी व आणखी माहिती गोळा करण्यासाठी वेळ हवा असल्याचे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. या मुद्दयावर बोलताना, मराठा आरक्षणासाठी आंदोलने होऊनही सरकारला आरक्षणाचा विषय नीट हाताळता आलेला नसल्याची टीका मलिक यांनी केली. आघाडी सरकारने १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिल्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध करत आघाडी सरकारचे सर्व निर्णय रद्द करण्याचे वक्तव्य त्यावेळी केले होते. 
आज उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंबंधी सुनावणी असतानाही राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. जातीआधारीत जनगणनेतील मराठा समाजाची माहिती गोळा करून पुन्हा न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करू, असे कारण सरकारतर्फे देण्यात येत आहे. वास्तविक जनगणनेमध्ये फक्त एससी,एसटी,ओबीसी आणि धर्माच्या आधारावरच गणना केली जाते. मराठा, ब्राह्मण यांची जातीआधारीत गणना होत नाही. मुळातच जनगणनेमध्ये जी माहिती उपलब्ध नाही. त्याची पूर्तता राज्य सरकार कशी करणार, असा सडेतोड प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. आघाडीच्या काळात नारायण राणे समितीने संपूर्ण सर्व्हे करुनच आरक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या समितीचा अहवाल न्यायालयात सादर करून मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

संबंधित लेख