अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन

18 Oct 2016 , 05:12:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिके अंतर्गत झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चोवीस तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या १०३ पाण्याच्या टाक्यांचे भूमिपूजन पवार यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या भेटीदरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी पवारसाहेबांनी केल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अजित पवार यांनी यावेळी कोणाचेही नाव न घेता सत्ताधारी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांना सालगडी समजतात का, असा सडेतोड सवाल उपस्थित करत मंत्र्यांवर सडकून टीका केली. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील वाचाळ मंत्र्यांना आवर घालावा अशी सूचनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
यावेळी मराठा आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार फक्त ठराव करतंय, बाकी काही नाही, असे वक्तव्य केले. आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. या राज्य सरकारनेही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. बारामतीमध्ये रविवारी दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. असे प्रकार वाढतच आहेत, कारण लोकांच्या मनात पोलीस आणि कायद्याची भीती राहिलेली नाही, लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहे ते यामुळेच असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कोपर्डीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तातडीने फाशी देण्याची मागणीही पवार यांनी यावेळी केली.

संबंधित लेख