महाराष्ट्रात दारूबंदीबाबत नवी नौटंकी सुरू, नवाब मलिक यांचा सरकारला टोला

02 Dec 2015 , 04:37:42 PM

बिहारच्या दारूबंदी निर्णयानंतर आता महाराष्ट्रात दारूबंदीबाबत नवी नौटंकी सुरू झाली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्र सरकारला लगावला आहे.

एकदा राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणतात, सरकार दारूबंदी करणार.नंतर ते शक्य नसल्याचे सांगतात. महसूलमंत्री एकनाथ खडसेदेखील एकीकडे सांगतात राज्यात दारूबंदी शक्य नाही पण दुसऱ्या बाजूला त्यांचेच आमदार पत्र लिहून सांगतात दारूबंदी करावी, याचा अर्थ काय, असा सवाल नवाब मलिक यांनी केला. आधी मंत्री आणि आमदारांनी दारू सोडावी, जनता आपोआप त्यांचं अनुकरण करेल, अशी कोपरखळीही मलिक यांनी मारली आहे. सरकारला खरेच दारूबंदी करायची असल्यास या निर्णयाचे आम्ही स्वागतच करू असे मलिक यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंना टोला-

'सेनेला मंत्रीपदे किती मिळणार याची चर्चा सोडून, डाळीवर आणि महागाईवर चर्चा कधी करणार?' असा सवाल मलिक यांनी केला.दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी, 'गाईंवर चर्चा काय करता, महागाईवर करा' असा टोला भाजपला लगावला होता. आता डाळीचे भाव कडाडले असताना उद्धव ठाकरे त्यावर चर्चा का करत नाहीत,” असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला. राज्यातील जनतेला उद्धव ठाकरेंकडून उत्तरांची अपेक्षा आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

मेट्रोची नवी दरवाढ अन्यायकारक-

याखेरीज मुंबई मेट्रोची नवी दरवाढ ही अन्यायकारक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. मेट्रो सर्वसामान्यांसाठी आहे की श्रीमंतासाठी असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले. रिलायन्सच्या निरंकुश कारभारावर अंकुश लावून जनतेला दिलासा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख