बोरी येथे राष्ट्रवादीचे साडेतीन तास रास्तारोको

05 Dec 2016 , 05:23:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार विजय भांबळे आणि उपसरपंच अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर तालुक्यातील बोरी येथे विजेच्या प्रश्नाबाबत आंदोलन करण्यात आले. जिंतूर-परभणी रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी तब्बल साडेतीन तास रास्तारोको केला होता.

राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून याआधीही विजेच्या समस्येसंबंधी निवेदन देण्यात आले होते. मात्र काम अगदी संथ गतीने होत होते. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. पाच एन.व्ही.ए.च्या ट्रान्सफार्मरचे काम जलद गतीने करण्यात यावे, बोरी येथील घरांवरील विजेच्या तारा काढण्यात याव्या, बोरी परिसरात असलेल्या ६३ के. व्ही. ची डी.पी. बदलून १०० के. व्ही. टाकावी, शासन निर्णयाप्रमाणे कृषीपंपाना १२ तास वीज पुरवठा व घरगुती उपभोक्त्यांसाठी १८ तास वीज देणे, वणी फिडर स्वतंत्र करणे, चांदज फिडरचा लोड कमी करणे इत्यादी मागण्या या आंदोलकांतर्फे करण्यात आल्या.

साडेतीन तास चाललेल्या आंदोलनाला लिखीत आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. या लिखीत आश्वासनामध्ये १५ दिवसाच्या आत सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन महावितरणचे अधिक्षक अभियंता उदय जानार, कार्यकारी अभियंता जायभाय, उपअभियंता ए. व्ही. एमनीवार, कनिष्ठ अभियंता मानकरने दिली.

यावेळी वीज प्रशासनाकडून डीवायएसपी अनिल कांबळे, सपोनी शेख, अवसरमोल, दळवी, राखीव पोलीस दलाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच माजी सभापती अशोकराव चौधरी, सरपंच सखाराम शिंपले, अनंतराव चौधरी, शरद अंभुरे, प्रसाद बुधवंत, विजयकुमार चौधरी, पाशा पटेल, शशिकांत चौधरी, संजय शर्मा, ३५ ते ४० गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संबंधित लेख