लगाके लाईन मे देस, तुम चले गये परदेस – धनंजय मुंडे

08 Dec 2016 , 06:09:24 PM

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्य लोक, शेतकरी, मजूर यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ना चिठ्ठी, ना कोई संदेश, लगाके लाईन मे देस, तुम चले गये परदेस हे आता चालणार नाही असे म्हणत नोटबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी निघून गेल्याबाबत टिपण्णी करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नोटबंदीच्या मुद्द्यावर सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी तसेच गरीब जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सांगितले.

यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, चांदया पासून बांद्यापर्यंतच्या माणसाला फटका बसला अशा या विषयावर चर्चा होत आहे. रांगेत काळे पैसेवाले कोणी नव्हते तर गरीब लोक रांगेत होती. देशातील १२५ कोटी लोक आज रांगेत आहेत. काळा पैसा आला की नाही ते माहीत नाही पण या रांगांमुळे ७० लोकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. राज्यातले १२ लोक बळी गेले त्यांना जबाबदार कोण आहे, असा सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. या मृत्यूला जबाबदार कोण ? ३०२ चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री नोटबंदीला आर्थिक स्वातंत्र्य लढा म्हणत असतील, तर त्यामुळे जे बळी गेले ते शहीद नाहीत का, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला. आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्यात रांगेत मृत्यू झालेल्यांना सदनात श्रद्धांजली अर्पित करावी अशी मागणी यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. नोटाबंदीच्या चर्चेचा अर्थ देशभक्तीशी जोडू नका , देशभक्तीचा विषय येईल तेव्हा आम्ही गोळ्या खायला तुमच्या पुढे असू असे सांगत धनंजय मुंडे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. 
मन की बात सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला लागले त्यावेळी सर्वसामान्य जनतेला वाटले की पंतप्रधान जनधन खात्यात १५ लाख जमा करण्याची घोषणा करत आहेत की पाकिस्तान विरोधी लढाईची? पण नोटबंदीची घोषणा करून जनतेचे नुकसानचं केले आहे. आज राज्यातील जनतेचे २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे ती नुकसान भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी केली.

सलग चार वर्षे दुष्काळ होता तो सहन केला, पण आता चलनबंदीचा दुष्काळ आला आहे. चलनबंदीचे हे संकट सरकारने आणलेले सुलतानी संकट आहे. जिल्हा बँका , पतसंस्था यांच्यावर आकसाने व्यवहार बंदी घातली आहे. यामुळे कांदा उत्पादक, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यांची भरपाई देणार कोण? असा संतप्त सवाल मुंडे यांनी केला.

आजकाल टीव्हीवर चहावाला, नारळपाणी वाला पेटीएम वापर करतानाची जाहिरात दाखवली जाते. पण नारळ काढणारा आणि ज्याला विकलाय ते काय करणार? "मेरे भाईयो और बहनो" या घोषणेची आता भीती वाटायला लागली आहे. काळ्या पैशावाले मस्त आहेत, जनता त्रस्त आहे, असे म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली.

संबंधित लेख