हवा बदल, हवाय विकास.. मुंबईत विकासात्मक बदल घडविण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार

02 Feb 2017 , 11:08:58 PM


बस्स झाले आता... हवा बदल, हवाय विकास ही प्रत्येक मुंबईकराची भावना ओळखत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर  व मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईकरांच्या मूलभूत तसेच शहराच्या विकासात्मक गरजांचा विचार करून पक्षातर्फे जाहीरनामा बनवण्यात आला आहे. याअंतर्गत मुंबईकरांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत जाहीरनाम्यात भर देण्यात आला असून प्रत्येक मुंबईकराशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी आहे आणि ती निभावण्यात येणार आहे, असा निर्धार सचिन अहिर यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच मुंबईचा विकास करू शकते त्यामुळे आपले बहुमुल्य मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच द्या असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार विद्या चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सुधाकर वड्डे, मुंबई उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुबारक खान, माजी आमदार अशोक धात्रक, माजी नगरसेवक रवींद्र पवार आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्दे :
प्रत्येक कुटुंबाला ७०० लिटर शुद्ध व स्वच्छ पाणी मोफत देण्यात येणार.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची क्षमता वाढवण्यात येणार.
बेस्ट विद्युत ग्राहकाला १०० मीटर युनिट्स मोफत करण्याबाबत योजना.
बेस्ट बसेसचे किमान भाडे ५ रुपये तर जास्त भाडे २० रुपये करण्याचा प्रयत्न केला जाणार
मुंबई शहर व पूर्व-पश्चिम उपनगरांतील मुख्य रस्त्यांचे टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण करणार, नवीन पार्किंग पॉलिसी बनवणार, भविष्यात मुंबईच्या रसत्यांवर खड्डे दिसणार नाहीत.
निरामय आरोग्य योजनेअंतर्गत वर्षाला १०१ रुपये भरून शासकीय आणि खासगी रुग्णालयात आरोग्य सेवा योजना दिली जाणार.
मुंबईकरांचा आरोग्यविमा उतरवून त्याचे प्रिमियम मनपा आपल्या तिजोरीतून भरेल.
मुंबईतील डंपिंग ग्राऊंडना चारही बाजूने कुंपण घालून सीसीटीव्ही कॅमऱ्याद्वारे २४ तास देखरेख करणार.
एसएमएस, व्हॉट्अपद्वारे 'कचरा हटाव मोहीम' योजना राबवणार.
झोपडपट्टीवासियांना सोयी-सुविधा दिल्या जाणार, झोपडपट्टीवासियांचे जीवन सुखकर करणार.
महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून व्यवसाय शिक्षण व तंत्रशिक्षणयुक्त शिक्षण विद्यार्थ्यांना देणार.
मुंबईभर प्रत्येक वॉर्डात मोफत वाय-फायची सुविधा देणार, आपत्कालीन व्यवस्थेसाठी वॉर्डनिहाय २४ तास फ्री कॉल सेंटर्स उभारणार.
महिला बचत गट आणि सहकारी संस्थांच्या सहकार्याने मोबाईल व्हेंडर्स मार्फत घरगुती व महिलांच्या उपयोगी वस्तुंची वितरण साखळी निर्माण करणार.
बचत गटांसाठी निधी व जागा उपलब्ध करुन देणार.
समुद्र किनाऱ्याजवळील स्थानिक भूमीपूत्रांची लाईफ गार्ड म्हणून नियुक्ती करणार.

संबंधित लेख