भाजपाला अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने जागा दाखवून दिली - दिलीप वळसे पाटील

02 Mar 2017 , 05:35:25 PM

भाजपाला अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने जागा दाखवून दिली व प्रतिकूल परिस्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अहमदनगर जिल्ह्यात चांगले यश मिळवले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नगर जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी केले. राष्ट्रवादी भवन येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. निवडणुका या विचारधारेवर लढवल्या जातात, परंतु यावेळच्या निवडणुका वेगळ्या वळणावर लढवल्या गेल्या. कधी नव्हे एव्हढा पैशाचा वापर करून करून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला गेला, अशी टीका वळसे पाटील यांनी यावेळी केली. पण या परिस्थितीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता उभारी घेऊन आता आपली पुन्हा ताकद वाढवायची आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.  आतापर्यंत झालेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड धनशक्तीचा वापर झाला. काळा पैसा नष्ट करायचा होता सरकारचा उद्देश असेल तर निवडणुकीत प्रचंड पैसा कुठून आला? याचा विचार जनतेने करणे गरजेचे आहे. नोटाबंदीमुळे जनतेला वेठीस धरले गेले, सरकारने आतापर्यंत कोणतेही ठओस काम केलेले नाही, त्यामुळे सरकारचे चुकीचे निर्णय कार्यकर्त्यांनी जनतेसमोर आणावेत, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले. यावेळी जेष्ठ नेते मधुकर पिचड, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, आमदार अरुणकाका जगताप, प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, आमदार वैभव पिचड, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषाताई गुंड, माजी आमदार पांडुरंग अभंग तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख