प्रशांत परिचारकांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही – धनंजय मुंडे

07 Mar 2017 , 07:13:32 PM

परिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. आज याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिनंदनपर प्रस्तावानंतर परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. विधान परिषदेच्या सदस्याने सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान केला, याचा अर्थ तो या सभागृहाचा अपमान आहे. त्यामुळे परिचारकांना तात्काळ निलंबित करावे, किंबहुना हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनीच मांडावा, अशी मागणीही मुंडे यांनी केली. तसेच जोपर्यत निलंबन होणार नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका मुंडे घेतली. मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला काँग्रेसचे भाई जगताप, शरद रणपिसे, शिवसेनेच्या निलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, विद्या चव्हाण आणि जयदेव गायकवाड तर लोकभारतीचे कपिल पाटील यांनीही समर्थन दिले.
प्रशांत परिचारक हे सोलापूर स्थानिक प्राधिकारणातून विधानपरिषदेवर निवडून गेलेले भाजप पुरस्कृत आमदार आहेत. ज्यावेळी त्यांनी सदर वक्तव्य केले होते, त्यावेळी सर्व स्तरातून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. 
निवडणुकीच्या काळात सर्वच नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करत असतात. पण राजकारणासाठी सैन्यदलाच्या कुटुंबियांचा अपमान करणे दुर्दैवी आहे. वरिष्ठ सभागृहाच्या सदस्याकडे समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाते. अशावेळी या सभागृहाच्य सदस्याने असे अवमानकारक वक्तव्य काढले असेल तर त्याचा फक्त निषेध करुन चालणार नाही तर त्यांचे तात्काळ निलंबन करण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व करावे, अशी प्रतिक्रिया हेमंत टकले यांनी यावेळी व्यक्त केली. आज स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी असे वक्तव्य करणाऱ्याला फासावर लटकवले असते, असे प्रतिपादन शिवसेनेच्या आ. निलम गोऱ्हे यांनी केले.
यावेळी भाजपच्या एकाही आमदाराने निलंबनाच्या प्रस्तावावर भाष्य केले नाही. मात्र सभागृह नेते चंद्रकांत पाटिल यांनी सभापती रामराजे-निंबाळकर यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल, तो सरकारला मान्य असल्याचे सांगितले.

संबंधित लेख