आधी कर्जमाफी द्या, कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही - जयंत पाटील

15 Mar 2017 , 11:11:16 PMगेली ७ अधिवेशने विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होत आहे. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी तेव्हाच विधिमंडळाचे कामकाज चालू देऊ, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते जयंत पाटील यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाल्यानंतर पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना विरोधकांची भूमिका विशद केली, यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील  आणि काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे उपस्थित होते.
नोटाबंदी, दुष्काळ, नापिकीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून सरकारने त्वरीत कर्जमाफीची घोषणा करावी, अन्यथा आम्ही कामकाज चालू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला. राज्यात पुढील २ वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे ही आमची राजकीय मागणी नसून शेतकऱ्यांच्या हितामध्ये राजकारण आणणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीमुळे बँकांना फायदा होईल असे सरकारला वाटत असल्यास त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या हातात कर्जमाफीची रक्कम द्यावी, अशी सूचनाही पाटील यांनी सरकारला केली.

संबंधित लेख