आमदारांचे निलंबन हा लोकशाहीचा खून - अजित पवार

27 Mar 2017 , 10:55:34 PM


अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठीच भाजपने विरोधक आमदारांचे निलंबन केले. सरकारची ही कृती घटनाविरोधी असून हा लोकशाहीचा खून असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, शेखर गोरे, प्रभाकर घार्गे, राजाभाऊ उंडाळकर, सुनील माने, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पक्ष पद देऊ शकते, तसेच चुकीचे काम केल्यास पद मागेही घेऊ शकते, हे सर्वांनी जाणून पाय जमिनीवर ठेवून जनतेसाठी काम करावे, पदाधिकारी व पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती यांनी पारदर्शक कारभार करून लोकांचा विश्वालस संपादन करावा, असे आवाहन यावेळी पवार यांनी नवीन सदस्यांना केले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसांची कार्यशाळा महाबळेश्वरला आयोजित करावी, या कार्यशाळेत कामकाज कसे करावे, पाठपुरावा कसा करावा, लाभार्थ्यांना लाभ कसा देता येतो, स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी काय करावे याचा ऊहापोह व्हावा, तसेच आमदारांनीही सदस्यांसाठी वेळ द्यावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
स्व. चव्हाण साहेबांनंतर आदरणीय शरद पवार  साहेबांवर सातारा जिल्ह्याने प्रेम केले. सातारा व पुणे या दोन जिल्ह्यांनी राष्ट्रवादीला बहुमत दिले. पुणे जिल्ह्याला जे जमले नाही ते सातारा जिल्ह्याने सर्व पंचायत समितीत सभापती आणून करून दाखविले. विधान परिषदेच्या निवडणुकीत जे झाले ते पुन्हा घडू नये. सध्या केंद्रात व राज्यात आपले सरकार नाही. त्यामुळे संजीवराजेंवर आणि सर्व सदस्यांवर जिल्हा परिषदेची सत्ता चालविण्याची मोठी जबाबदारी आहे. ती सर्वांनी सक्षमपणे पेलावी, असे आवाहन पवार यांनी केले.
 

संबंधित लेख