उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते, मग शेतकऱ्यांबाबत दुजाभाव का? - अजित पवार

02 Apr 2017 , 12:40:04 AM

औरंगाबाद येथे संघर्षयात्रेदरम्यान झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या शेतकऱ्यांबाबतच्या निष्क्रियतेवर तोफ डागली. उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते, ते यांचे जावई लागतात का? मग शेतकऱ्यांबाबत दुजाभाव का? असा जळजळीत सवाल त्यांनी सरकारला केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,  माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, पतंगराव कदम, अब्दुल सत्तार, बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, आघाडी सरकार असताना आम्ही शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला. दुष्काळात पाण्याची सोय केली. जनावरांसाठी चारा छावण्या उभारल्या. ते शेतकऱ्यावर उपकार नव्हते, तर तो आमचा धर्म होता, आमचं कर्तव्य होतं. आता बळीराजा संकटात सापडला असताना त्याला मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. 

शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांचाच भाजपला विसर पडला असल्याची टीका पवार यांनी केली. मात्र, शेतकऱ्यांनी ठरवले तर ते सर्वांना घरी बसवतील, असा इशारा त्यांनी दिला. कर्जमाफीसाठी आम्हाला आमदारकीची एक टर्म सोडायला लागली तरी चालेल, १९ आमदारांचे निलंबन मागे घेतले तरी आम्ही सभागृहात जाणार नाही, संघर्षाची ज्योत आता पेटली असून विरोधक आता मागे हटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफी देता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, आम्ही शेतक-यांना न्याय देऊ, असे पवार म्हणाले.

दरम्यान कर्जमाफीच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि त्यांचे सहकारी गेल्या ६ दिवसापासून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सदस्यांच्या विनंतीनंतर पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्तार यांनी उपोषण सोडले.

संबंधित लेख