शिवसेनेने कोकणातील विकासकामे दाखवा, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे केंद्रीय मंत्री गीतेंना आव्हान

01 Aug 2017 , 05:52:20 PM

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या कोकणवासी जनतेला खड्यांचा सामना लागणार आहे. केंद्रात मंत्री असलेल्या अनंत गीतेंनी गेल्या तीन वर्षात साधी रस्ते दुरुस्तीही केली नाही. त्यांनी केलेल्या कामाचा पुरावा दाखवावा, असे जाहीर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले. दादर येथील शिवाजी मंदिरात पार पडलेल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, तळे आणि म्हसळा तालुक्याच्या मेळाव्यात ते बोलत होते.

श्रीवर्धन, तळे, म्हसळा या तालुक्यातील मुंबईवासीयांचा मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि स्थानिक स्वराज्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. अनिकेत तटकरे हे या कार्यक्रमाचे आयोजक होते.
गिते यांना निवडून येण्यासाठी ए का सुनील तटकरे नावाच्या उमेदवाराचा आसरा घ्यावा लागला. त्यांनी त्या तटकरेचे तरी आभार मानावेत, असा टोला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावला. गीतेंचा पक्ष देशात व राज्यात सत्तेत आहे. पण विकासाची कोणती कामे केली हे त्यांनी दाखवावे, असे आव्हान तटकरे यांनी दिले.

पवार साहेबांच्या पुरोगामी धोरणामुळे महिलांना सत्तेत संधी मिळत आहे, असे तटकरे म्हणाले. मला या तालुक्यांनी मोठी साथ दिली आहे. कधी काळी शिवसेनेची सत्ता असलेल्या तालुक्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आहे. कार्यकर्त्यांचे हे यश असल्याचे तटकरे यांनी सांगितले. जातपात न बघता विकासाचे राजकारण आपण करत आहोत त्यामुळेच हे दिवस आले. या पुढेही विकासाचेच राजकारण करणार अशी, ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सवी अर्थसंकल्प मांडण्याची संधी मला म्हणजेच कोकणाला, श्रीवर्धन तालुक्याला मिळाली याचा अभिमान तटकरे यांनी व्यक्त केला.

तटकरे यांच्या हस्ते या तालुक्यातील मुंबईत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या तालुक्यातील मुंबईकरांची कार्यकारणी तटकरे यांनी जाहीर केली. या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती लाभली.

संबंधित लेख