मोपलवार यांची हकालपट्टी, प्रकाश मेहतांचं काय? विरोधकांच्या प्रश्नावरून सभागृहात गदारोळ...

05 Aug 2017 , 06:22:18 PM

सभागृह दिवसभरासाठी तहकूूब...

आज एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या विषयावर आज विधान सभेत गोंधळाच्या वातावरणात चर्चा झाली. मोपलवार यांची एका महिन्यात चौकशी केली जाईल. सभागृहात विरोधी पक्षाची भावना पाहता मोपलवार यांना तोपर्यंत त्या पदावर ठेवले जाणार नाही, एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून त्यांना हटवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

पण प्रकाश मेहता यांच्याबद्दल सरकारतर्फे कोणतीही कारवाई होत नाही, यावर ज्याप्रमाणे एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाले असताना त्यांनी पद सोडले त्याच प्रमाणे सरकारने प्रकाश मेहता यांचा राजीनामा सरकारने घ्यावा, अशी मागणी विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी केली.

मोपलवार हा सरकारचा आवडता अधिकारी आहे म्हणून त्याला पाठिशी घातलं जातंय. आता ही दोन प्रकारची लढाई वाटत आहे. एका बाजूला मोपलवार आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रकाश मेहता. ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध अमित शहा अशी झाली आहे. मुख्यमंत्री-पंतप्रधान मोपलवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत, तर अमित शहा प्रकाश मेहतांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे पाहता दोघांपैकी एकाचा बळी द्यायचा म्हणून मुख्यमंत्र्यांनी मोपलवार यांच्या बडतर्फीची घोषणा केली, असा आरोप विधिमंडळ गटनेते आ. जयंत पाटील यांनी केला. कुणाची नाळ कुठेही जुळलेली असली तरी प्रकाश मेहता यांनी सभागृहाची व जनतेची दिशाभूल केली आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा राजीनामा घेऊनच राहणार, अशी घोषणा त्यांनी केली. वरच्या सभागृहात प्रकाश मेहतांचा विषय निघाला तेव्हा चंद्रकांत पाटील बहिष्कार टाकून बाहेर पडले. प्रकाश मेहतांचीही गंभीर चूक आहे. त्यांनी स्वतः चूक मान्य केलेली आहे. आपण खडसेंना एक न्याय देता आणि मेहतांना दुसरा, हे चांगले दिसत नाही, असा टोमणा त्यांनी सरकारला मारला. प्रकाश मेहतांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर केला, त्यातून बिल्डरला ५००–६०० कोटी रुपयांचा फायदा होणार होता. त्यामुळे प्रकाश मेहता यांचा राजीनामा घ्या आणि मोपलवार यांना निलंबित करा, अशी मागणी पाटील यांनी केली.

विरोधकांच्या आक्रमक मागणीनंतर सभागृहात बराच गदारोळ माजून अखेर सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

संबंधित लेख