अकार्यक्षम कुलगुरूंना हटवण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी...

07 Aug 2017 , 10:19:28 PM

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मुंबई विद्यापीठाचे अकार्यक्षम कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून हटवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

ऑनलाईन पेपर तपासणीचा घाट घालत  पंचेचाळीस निकाल लागणे अपेक्षित असताना विद्यापीठाने ह्या कायद्याचे उल्लंघन केले. पेपर तपासणी प्रक्रिया लांबणीवर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विदेशातील प्रमुख विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेपासून ते वंचित राहिले आहेत.

ऑनलाईन पेपर तपासणीची संपूर्ण माहिती राज्यपालांना दिलेली नव्हती. विद्यापीठाने अनुभवी कंपनीला हे कंत्राट न देता मेरीट ट्रॅक या कंपनीला कंत्राट दिले. ऑनलाईन पेपर तपासणीचे प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली नाही. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा मार्च २०१७ मध्ये महाराष्ट्रात लागू झाल्यानंतरही ३ महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समिती किंवा प्र-कुलगुरू यांची नियुक्ती केली नाही. अजूनही मुंबई विद्यापीठासाठी पूर्ण वेळ परीक्षा नियंत्रकाची नेमणूक कुलगुरू करू शकलेले नाहीत. या सर्व गैरव्यवहारांबाबत ताबडतोब चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

कुलगुरू पदासाठी आवश्यक असलेले नियम डावलून डॉ. संजय देशमुख यांना हा पदभार देण्यात आला आहे. विद्यापीठ प्रशासन, परीक्षा विभाग, अन्य समित्या यातील कामाचा कोणताही अनुभव त्यांच्याकडे नाही. केवळ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि विनय सहस्रबुद्धे यांच्याशी असलेले नाते हाच निकष लावला आहे. अशा अपात्र, विद्यापीठ यंत्रणेशी पूर्ण अपरिचित अशा व्यक्तीची कुलगुरू पदावरील नेमणूक लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाचे वाटोळे करू शकते. स्वतःच्या अख्यत्यारीत तुघलकी निर्णय घेण्यामुळे तसेच परीक्षेच्या कालावधीत परदेशगमन करण्यात मग्न असणाऱ्या कुलगुरूंना बडतर्फ करण्यात यावे, अशी जोरदार मागणी मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

संबंधित लेख