फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्याबाबत सरकार गंभीर आहे की नुसतीच जुमलेबाजी? - नवाब मलिक

07 Sep 2017 , 06:55:22 PM

एडीआरच्या अहवालानुसार महिलांविरोधी सर्वांत जास्त गुन्ह्यांची नोंद भाजप आमदार व खासदारांच्या नावे

एडीआरच्या अहवालानुसार देशातील महिलांविरोधातील सर्वांत जास्त गुन्ह्यांची नोंद ही भाजपाच्या आमदार व खासदारांच्या नावे आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. पंतप्रधानांना हे लक्षात आहे का की त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत आले तेव्हा हे न्यायाचं मंदिर असून आपल्याला ते पवित्र करायचे आहे, अशी घोषणा केली होती. तसेच, एक वर्षाच्या आत फास्ट ट्रॅक कोर्ट बनवून प्रलंबित खटल्यांचा निकाल लावून अपराध्यांना शिक्षा केली जाईल, असेही म्हटले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. आज सुप्रिम कोर्टानेही यावर टिपण्णी केली आहे. आम्हाला पंतप्रधानांना विचारायचे आहे की तुम्हाला हे माहित होतं का की महिलांविरोधातील सर्वांत जास्त गुन्ह्यांची नोंद ही भाजपाच्या आमदारांच्या नावे आहे, म्हणूनच तुम्ही तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप फास्ट ट्रॅक कोर्ट बनवले नाहीत. तुम्ही याबाबतीत गंभीर आहात की ही देखील एक प्रकारची जुमलेबाजी आहे, असे प्रश्न मलिक यांनी विचारले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानंतर तुम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट बनवावेच लागतील. तेव्हा तुमच्या निवडून आलेल्या ज्या आमदारांविरोधात गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर कारवाई करा, ही देशातील जनतेची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख