सैनिकाच्या कुटुंबियांच्या शोधासाठी राष्ट्रवादीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

24 Oct 2017 , 08:51:45 PM

भारतीय सैन्यातील नायक अनिल गौंडगे (रा.सेलु, जि.परभणी) यांच्या पत्नी व मुलीच्या शोधासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत या मागणीसाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्या सैनिकासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सदर सैनिकाच्या कुटुंबियांच्या शोधासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याशी दूरध्वनीद्वारे मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. सैनिकाच्या कुटुंबियांच्या शोधासाठी केंद्र सरकार स्वतंत्र अधिकारी, टीम नियुक्त करेल असे अहिर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील अनिल गौंडगे हा सैनिक अरूणाचल प्रदेशात सेवेत असताना त्यांची पत्नी व मुलगी दोन महिन्यांपासून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी अरूणाचल प्रदेशात पोलीसात तक्रार नोंदवूनही अद्याप तपास लागत नसल्याने गौंडगे कुटुंबिय हवालदिल झाले आहे. देशासाठी प्राणपणाने काम करणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांचा शोध लागत नसल्याने राज्यात आणि सोशल मीडियावरूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याबाबत अनिल गौंडगे यांनी मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर मुंडे यांनी अनिल गौंडगेसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कुटुंबियांचा तातडीने शोध लावावा यासाठी महाराष्ट्र सरकारनेही प्रयत्न करावेत अशी मागणी केली.

यावेळी मुंडे यांच्या समवेत परभणीचे आमदार विजय भांबळे, आमदार विद्याताई चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित होत्या.