बोलघेवड्या सरकारला जनता पायउतार केल्याशिवाय राहणार नाही – सुनील तटकरे

13 Nov 2017 , 06:01:16 PM

- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घातले नोटाबंदीच्या निर्णयाचे वर्षश्राद्ध

सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशाला आर्थिक संकटात टाकले. नोटबंदीच्या माध्यमातून सरकारने जे काही साध्य होईल असे सांगितले होते त्यापैकी काहीही झालेले नाही. या बोलघेवड्या सरकारला जनता पायउतार केल्याशिवाय राहणार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने घेतलल्या नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सरकारविरोधात मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सुनील तटकरे उपस्थितांना संबोधित करत होते. या आंदोलनादरम्यान पक्षातर्फे नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घातले.

नोटाबंदीमुळे देशाला आर्थिक चालना मिळेल, रोजगार उपलब्ध होईल, देशातील अतिरेकी कारवाया बंद होतील असे सरकारतर्फे सांगितले गेले होते. मात्र यातले काहीच झाले नाही, उलट नोटाबंदीच्या निर्णयामुळे देश आर्थिक मंदीकडे वळला आहे असा आरोप तटकरे यांनी केला. नोटाबंदीमुळे देशाचे जे नुकसान झाले त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे असेही ते म्हणाले. नोटाबंदीमुळे देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. हा देशातला सर्वात मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख