शेतकऱ्यांचा लढा आम्ही एकाकी पडू देणार नाही – शंकर अण्णा धोंडगे

30 Nov 2017 , 06:19:35 PM

शासनाने कर्जमाफीची फसवी घोषणा केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना पेन्शन लागू केली नाही. शेतीमालाचे भाव पाडले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी राजा हा संकटात सापडला आहे. पुणे जिल्ह्यातील कानगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १७ दिवसांपासून लढा सुरू केला आहे. परंतु त्यांचा लढा सोडवण्याऐवजी त्यांना त्रास देण्याचे काम या शासनाने सुरू केल्याने या शेतकऱ्यांचे बळ वाढावे व त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास ३०० गावात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार आणि किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली.

महाराष्ट्रातील युती सरकारने कपटबुद्धीने शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचे काम सुरू केले आहे. सोयाबीन, तूर, कापूस तसेच विविध धान्य आणि डाळी यांचे भाव बाजारात पाडण्याचे काम शासन करत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत अडकवण्याचे पाप महाराष्ट्र शासन कपटबुद्धीने करीत आहे असा आरोप शंकर अण्णा धोंडगे यांनी केला. कानगाव येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या लढ्याला आम्ही एकाकी पडू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.