कर्जमाफी झालेला एकही शेतकरी मार्गात भेटलेला नाही : अजित पवार

05 Dec 2017 , 07:25:18 PM

हल्लाबोल पदयात्रेत गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मार्गक्रमण करत आहे. या दरम्यान आम्ही सर्वांनी अनेक शेतकऱ्यांशी भेट घेऊन संवाद साधला, पण दुर्दैवाने कर्जमाफी झालेला एकही शेतकरी अद्याप भेटलेला नाही, अशी खंत विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज व्यक्त केली. इसापूर फाटा येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी, कर्जमाफीच्या नावाने सेना भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खा. सुप्रिया सुळे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. शशिकांत शिंदे, आ. राजेश टोपे, माजी आमदार सुरेश देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.
बोंडआळी आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बोनसबाबत बोलताना गुजरातमध्ये निवडणुका आहेत म्हणून तिथं शेतकऱ्यांना बोनस दिला जातोय. हे भाजप सरकार प्रत्येक गोष्ट निवडणुकीवर डोळा ठेवूनच करणार आहे का? असा सवाल पवार यांनी सरकारला केला. सर्वत्र अभ्यास, चौकशी व समिती एवढ्यावरच सरकारचे काम पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापारी, एसटी कामगार, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी, युवक एकही घटक या सरकारवर समाधानी नाही, असेही ते म्हणाले.
राज्यातील १४०० शाळा बंद करण्याचा सरकारचा मानस हा ठराविक लोकांकडेच शिक्षणाची मक्तेदारी राहावी, यासाठी असल्याचा दिसतो, असे ते म्हणाले. आज मेरीटमध्ये मुली सर्वांत जास्त येत आहेत. ग्रामीण भागात शाळा नसतील तर मुली लांबच्या शाळेत जाणार नाहीत. या मुलींनी कुठे शिकायचे, अशी तळमळ त्यांनी व्यक्त केली. सरकारच्या शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांनी शाश्वत शेतीच्या नावाने मोठ-मोठ्या गप्पा मारल्या. येथे शेतकरी तर कीटकनाशक फवारणी करताना मरतो आहे, हीच का तुमची शाश्वत शेती, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
११ डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही सरकारकडे किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, किती रुपयांची मिळाली? याचे आकडे मागणार आहोत. तसेच, नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत सरकारच्या विरोधात निषेध सभा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

संबंधित लेख