सेवाग्राम येथील मेडिकल चौकात राष्ट्रवादीचा हल्लाबोल

07 Dec 2017 , 06:35:57 PM

सेवाग्राम येथील मेडिकल चौकातील हल्लाबोल पदयात्रा आंदोलनाच्या सहाव्या दिवसाची सांगता सभा संस्मरणीय ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अक्षरशः उपस्थितांमध्ये आंदोलनाचे नवस्फुलिंग चेतविले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मानवंदना देऊन आजची पदयात्रा सुरू झाली याची जाण ठेवून तटकरे यांनी आपल्या सोबतच्या सर्व सहकारी नेत्यांचे तसेच उपस्थितांचे स्वागत केले आणि खोटारड्या राज्य सरकारवर घणाघाती प्रहार आपल्या भाषणातून केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच विदर्भाच्या भूमीत हमीभावाची घोषणा केली होती याची आठवण त्यांनी करून दिली. आज या सरकारच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आणि आणि ही गरीब शेतकऱ्यांची कशी फसवणूकच केली गेली याचं विवेचन सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात केलं. मुख्यमंत्री होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी याच विदर्भाच्या भूमीत सोयाबीनच्या शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन केलं होतं याचीही आठवण तटकरे यांनी केली आणि सत्तेत आल्यानंतर मात्र या आंदोलनाचा देवेंद्रजींना कसा सोयीस्करपणे विसर पडलाय याचीही जाणीव त्यांनी उपस्थित श्रोत्यांना करून दिली.

खरी कर्जमाफी आदरणीय पवारसाहेबांनीच कशी करून दिली होती याचीही जाणीव त्यांनी लोकांना करून दिली. शरद पवार यांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळात देशातील अन्नधान्याच्या आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या जीवनात झालेले स्थित्यंतरही त्यांनी उलगडून सांगितले.

या पदयात्रे दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या खांद्यावर झेंडा घेऊन वाटचाल केली आता हा झेंडा आपल्याला उतरवायचा नाही तर हा झेंडा महाराष्ट्रात डौलाने फडफडला पाहिजे असं सांगत प्रदेशाध्यक्षांनी पदयात्रेतील घोषणांच्या माध्यमातून उपस्थित श्रोतृवृंदाला आपल्यासोबत ललकारी द्यायला भाग पाडलं आणि सेवाग्राम परिसरातील वातावरण भारलं गेलं.

राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सरकारने लोडशेडिंग केलेले आहे. याचा निषेध म्हणून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सेवाग्राम येथील मेडिकल चौकात सभेला जमलेल्या नागरिकांना मोबाइल टॉर्च चालू करण्याचे आवाहन केले होते. त्याला उपस्थित नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.

संबंधित लेख