खालापूर तालुक्यातील औद्योगिकीकरणाचा प्रस्ताव रद्द करा : आ. सुनील तटकरे

23 Dec 2017 , 07:17:27 PM

खालापूर (रायगड) तालुक्यातील केळवली, वांगणी, घोडवली, कांढरोली, नावंढे, माणकिवली, अंजरुण, हाळखुर्द तसेच कर्जत तालुक्यातील तळवली या गावी एमआयडीसीच्या भाग - २ च्या प्रकल्पासाठी भूसंपादन प्रस्तावित आहे. या भूसंपादनाला शेतकर्‍यांचा ठाम विरोध आहे. त्यामुळे सरकारने या औद्योगिकीकरणाचा प्रस्ताव रद्द करावा ही मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सभागृहात लक्षवेधीद्वारे केली.

खालापूर तालुक्यातील ७५ टक्के जमिनी या भाग - १ च्या प्रकल्पात गेलेल्या आहेत. यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप योग्य तो मोबदला मिळालेला नाही. त्यात आता भाग - २चे भूसंपादन प्रस्तावित असल्याने शेतकर्‍यांकडून याला विरोध होत आहे. खालापूर तालुक्यात भाजीपाला पिकवण्यासाठी फक्त वर सांगितलेल्या गावांचाच ‘ग्रीन बेल्ट’ उरलेला आहे. त्यामुळे आता या बेल्टवरही औद्योगिकीकरण झाले, तर खालापूर तालुका बरबाद होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. स्थानिकांना उद्योगात रोजगार मिळतो, हा सरकारचा दावा फोल आहे. भाग-१ मध्ये स्थानिकांना रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने किमान उद्योगाच्या नावावर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करु नये, अशी मागणी त्यांनी केली.

यावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी १५ दिवसांत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे उत्तर दिले आहे.


संबंधित लेख