गिरीश बापट यांची भीती खरी ठरणार - अजित पवार

11 Jan 2018 , 07:27:08 PM

कॅबिनेट मंत्री गिरीश बापट म्हणाले की, राजकारणात कधी काय होईल हे माहिती नाही. जे मागायचे आहे, ते आताच मागून घ्या. मला वाटते बापट यांची भीती खरी आहे. गुजरातमध्ये जे घडले ते महाराष्ट्रात घडेल की काय? अशी भीती त्यांच्या मनात आहे. कारण मागच्या तीन वर्षात भाजप शिवसेनेने लोकांचा भ्रमनिरास केलेला आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, श्रीवर्धन या परिसरातील विविध विकास कामांच्या निमित्ताने ते आले होते.

भाजप शिवसेनेचे सरकार आल्यापासून देशाचा विकास खुंटला आहे. यांनी दिलेले एकही आश्वासन यांनी पूर्ण केले नाही. यावेळी श्रीवर्धन येते झालेल्या समारोपाच्या सभेत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रायगडमधील काही भागात शिवसेना दिसत असली तरी आज त्यांची परिस्थिती बिकट आहे. सेनेच्या मंत्र्यांनी अनेकदा राजीनामा देण्याची, सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली. मात्र त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. मनोहर जोशी चार वर्षे मुख्यमंत्री होते त्यांनी कोकणाला काय दिले? अनंत गीते अवजड खात्याचे मंत्री आहेत पण त्यांनी रायगडसाठी काय केले ? मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेनेचे मंत्री फक्त चहा प्यायला जातात का ? असा सवाल उपस्थित करुन अजित पवार यांनी सेनेच्या कार्यशैलीवर टीका केली.

कोकणातील विकासाबद्दल बोलताना ते म्हणाले की, आदरणीय पवार साहेबांनी कोकण रेल्वेसाठी पुढाकार घेतला होता. फळबागांसाठी धोरणात्मक निर्णय घेतले. आम्ही पदावर असताना कोकणचा विचार केला. मात्र सेना-भाजप तसे करताना दिसत नाही. आम्ही हजारो कोटींचे प्रकल्प इथल्या नागरिकांना दिले. विकासात्मक दृष्टिकोन असेल तर हे सगळे घडते. भाजप-शिवसेनेकडे असा दृष्टिकोन नाही. भाजप शिवसेनेचे सरकार आल्यापासून देशाचा विकास खुंटला आहे. यांनी दिलेले एकही आश्वासन यांनी पूर्ण केले नाही. सरकारने आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती, कुठे आहे आरक्षण ? कुपोषणामुळे हजारो मुले दगावली. अशावेळी ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा? असा संतप्त सवाल पवार यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रचंड मेहनत घेऊन इथल्या भागाचा विकास केला आहे. हे या विकास कामांमधून दिसून येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या मातीत एक वेगळाच गुण आहे म्हणूनच रायगडाने अनेक महापुरुष दिले. येथे येण्याची संधी मिळाली त्याबाबत फार आनंद होत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. अनिल तटकरे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, युवा नेते अनिकेत तटकरे उपस्थित होते.