पंतप्रधान उज्ज्वला योजना 'जुमले' की योजना - चित्रा वाघ

12 Feb 2018 , 11:52:43 PM

राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान उज्ज्वला योजना ही जुमले की योजना असल्याचे सांगत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी या योजनेची पोलखोल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आपल्याला रोज नव्या घोषणा ऐकायला मिळतात. या योजना गरिबांसाठी सुरू केल्या आहेत असे सरकारतर्फे सांगितले जाते पण प्रत्यक्षात त्यांचा लोकांना काहीच फायदा होत नाही हे वास्तव त्यांनी चित्रफितीद्वारे पत्रकार परिषदेत दाखवले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने राज्याच्या सहा जिल्ह्यातील महिलांशी पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या संदर्भात संवाद साधला आणि त्याची चित्रफित बनवली. या चित्रफितीतून पंतप्रधान उज्ज्वला योजनाही जुमले की योजना असल्याचा व या माध्यमातून महिलांचे दु:ख मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले. ही योजना परवडत नसल्याने महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. या धूर सोडणाऱ्या चुली म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारने केलेल्या घोषणांच्या धुरात नागरिकांची घुसमट होत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.

गॅस सिलेंडर घेतल्याने लोकांचे रॉकेल सरकारने बंद केले. काही लोकांवर बळजबरीने उज्ज्वला योजना थोपली जात असल्याचेही त्या म्हणाल्या. योजना मोफत आहे असे सांगितले गेले मात्र प्रत्येक्षात लोकांकडून पैसे आकारले जात आहे. त्याचप्रमाणे रिकामे सिलेंडर नेण्यासाठी, भरलेला सिलेंडर आणण्यासाठीही ग्रामीण भागातील लोकांना पैसे मोजावे लागत असल्याचे सत्य पुढे आले. गॅस सिलेंडरचे दर अर्ध्याने कमी करावेत अशी मागणी लोक करत आहेत. अर्थसंकल्पात सांगितले गेले की ५ कोटी परिवारांना या योजनेचा लाभ झाला आणि आणखी ८ कोटी परिवारांना या योजनेचा लाभ होणार. आता नक्की किती लाभ झालाय हे लोकंच सांगत आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात या फसव्या योजनेविरोधात आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आम्ही आणखी अभ्यास करू. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील वास्तव समोर आणू. आणि लोकांची खंत पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवून लोकांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश उपाध्यक्षा सोनल पेडणेकर व डॉ. भारती पवार उपस्थित होते.

संबंधित लेख