भाजपच्या सत्तेचे तण हा बळीराजाचा नांगरच आता उखडून फेकेल!

23 Feb 2018 , 08:00:53 PM

मंत्री गिरीश महाजन यांनी कापसाला सात हजार भाव मिळावा म्हणून विरोधात असताना अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. आज कापसाला तीन हजार भाव आहे, पण आता ते याबद्दल एक चकार शब्द बोलत नाहीत. विरोधी पक्षात असताना कापसाच्या भावासाठी आग्रही असणारे गिरीश महाजन सत्तेत असताना गप्प का?, असा सवाल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. हल्लाबोल आंदोलनाच्या धरणगाव येथील सभेत ते बोलत होते.
संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी नीटपणे होत नाही, अशी तक्रार ठिकठिकाणी महिला करत आहेत. आमचे सरकार असताना ही योजना सुरळीत सुरू होती. आता पुन्हा सत्ता आल्यावर एक दिवस आधीच या योजनेचे पैसे मिळवून देऊ, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवून घेत होते. पण आता या चौकीदाराला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असेही त्या म्हणाल्या.
राज्यात बळीराजाचे राज्य यावे, यासाठी आम्ही नांगराचे पूजन केले आहे. भाजपच्या सत्तेचे तण हा बळीराजाचा नांगरच आता उखडून फेकेल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की मी पंतप्रधान नाही तर या देशाचा चौकीदार आहे. मग मल्ल्या, मोदी हजारो कोटी घेऊन पळाले. त्यातले काही चौकीदाराला मिळाले की काय?,असा सवाल त्यांनी केला.
शरद पवार साहेबांनी प्रत्येक नुकसानीला भरपाई दिली. पण या सरकारला लाल्या कळत नाही की तुडतुड्या कळत नाही की काळ्या कळत नाही, असे हे शेती न कळणारे सरकार आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीशअण्णा पाटील यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नांमुळे धरणगाव येथे उड्डाणपूल झाला. आज जिल्ह्यात असे काही उड्डाणपुल आहेत, ज्याचे काम अपूर्ण आहे. या सरकारला विधायक कामे करता येत नाहीत. या सरकारची परिस्थिती म्हणजे “नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले.

संबंधित लेख