आम्हाला ‘अच्छे दिन’ नको; आमचे पूर्वीचे दिवस परत द्या, अशी जनतेची भावना - शरद पवार

05 Mar 2018 , 05:31:12 PM

सध्या सगळीकडे महागाई वाढली आहे. कारखाने बंद होऊ लागले आहेत. नवीन रोजगार उपलब्ध होणे बंद झाले आहे. कामगार वर्गावर अन्याय होत आहेत आणि हे दूर करण्याची जबाबदारी ज्यांची होती, ते असफल ठरले आहेत. त्यामुळे आम्हाला अच्छे दिननको, आमचे पूर्वीचे दिवस परत द्या, अशी जनतेची भावना असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले. हल्लाबोल आंदोलन आज मुंबई येथील आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील एक नीरव मोदी पीएनबी बँकेचे साडे अकरा हजार कोटींचा घोटाळा करुन पळून जातो, तरी त्याला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही. उलट या घोटाळ्यामुळे आता उद्योग सुरू करण्यासाठी युवकांना बँकेकडून कर्ज दिले जात नाही. विदर्भातील आमच्या सहकाऱ्यांनी सांगितले की रेशन दुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका देऊ लागले आहेत. बाहेरच्या देशात मका हे पशूखाद्य म्हणून वापरले जाते. त्यामुळे जनतेला जर नीट अन्नधान्य पुरवता येत नसेल, तर सत्तेत राहून सरकारचा काय उपयोग?, असा सवाल त्यांनी सरकारला केला.

शासकीय आश्रमशाळांत मुलभूत गरजांसाठी दर महिन्याला ९०० रुपये फी आकारायला सुरुवात केली आहे. आदिवासी, गरीब, भटक्या व विमुक्त जमाती या मागावर्गीय वर्गातील मुले आश्रमशाळेत शिकतात. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा हा निर्णय घेणाऱ्या सरकारला नादान म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोलच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाऊन सामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या पाठिशी पक्ष उभा असल्याचा संदेश दिला. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकणच्या जिल्ह्यातही हल्लाबोल यात्रा पोहोचेल, अशी माहिती त्यांनी दिली.

मुंबईतील व्यापार मोडकळीस आला आहे. विकासाच्या दृष्टीने इतर शहरांनी मुंबईला मागे टाकले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सरकार मुंबईकरांना मुलभूत गरजा पुरवण्यास अपुरे पडत आहे. अशा वेळी देशात परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये शरद पवार साहेबांची भूमिका महत्त्वाची ठरणार, असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

मुंबई महानगरपालिकेत खूप मोठा भ्रष्टाचार आहे. इथल्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही विधिमंडळात अनेक वेळा बोललो आहोत. मात्र त्याबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईला लुटण्याचे काम भाजप आणि शिवसेनेने केले आहे. त्यामुळे या सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागेल. आता ही लढाई परिवर्तनशिवाय थांबवायची नाही, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदैव मुंबईचा विकास करण्याचा प्रयत्न केला. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने बनवले गेले. त्यासाठी प्रफुल्लभाईंचे विशेष अभिनंदनही त्यांनी केले.

मुंबईचे एक विशेष महत्त्व होते. मात्र हे महत्त्व नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या राज्यात टिकून राहणार की नाही याबाबत माझ्या मनात शंका आहे. येथील सगळे व्यवसाय गुजरात आणि तेथील शहरात जात आहेत. ज्या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लागेल, तेव्हा आपल्याला या भाजपवाल्यांना घरी पाठवावे लागेल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  म्हणाले. मुंबईत झाडापासून कचऱ्यापर्यंत भ्रष्टाचाराचा मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे. या वटवृक्षाची छाया जर कुठे पडत असेल, तर ती वांद्र्यापर्यंत जात आहे. दिल्लीतील चौकीदाराच्या साक्षीने मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आज महागाई प्रचंड वाढली आहे. त्यातच नवी मुंबईतील विमानतळ २०१९ पर्यंत पूर्ण होईल, असे सांगत असताना कंत्राटदाराला मात्र २०२१पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री राज्यातील जनतेची फसवणूक का करत आहेत?, असा प्रश्न विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

भाजप सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले असले तरी सध्या या देशात सर्वांचेच वाईट दिवस सुरू आहेत. त्यामुळे अशा नाकर्त्या सरकारला जागा दाखवण्याची गरज असून यांना राज्यातून आणि देशातून हद्दपार करा, असे आवाहन खासदार माजिद मेमन यांनी केले.

हे सरकार बहिरे व आंधळे आहे. लोकांच्या वेदना सरकारला ऐकू येत नाहीत आणि हाल दिसत नाहीत. मंत्रालयासारख्या ठिकाणी जाळ्या लावल्याने लोकांचे प्रश्न सुटणार आहेत का?, असा सवाल आ. किरण पावसकर यांनी केला. तसेच, शिवसेना भावनिक राजकारण करते. पण मराठी शाळा बंद करण्याच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली.

राज्यात छेडछाडीच्या घटनांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आबांनी बलात्काराच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण हे सरकार किंवा मनपा क्राईम रेटकमी करण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही, अशी टीका महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली.

मुंबईत ४०-५० टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यांना संरक्षण देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने केले. मुंबईत मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सरकारचे नवे कामगार धोरण आर्थिक दरी वाढवणारे आहे, असा आरोप पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. तसेच, एकीकडे शेतकरी मरत आहे आणि मुख्यमंत्री आपल्या धर्मपत्नीसह गाणे गात आहेत, अशी टीका त्यांनी केली.

मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या कार्यक्रमात गुजरातमधील प्रकल्पाची जाहिरातबाजी सुरू होती. महाराष्ट्रातील जनतेच्या पैशावर तुम्ही गुजरातचा विकास करणार असाल तर ही जनता तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवेलच, असा विश्वास मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी व्यक्त केला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईत बकासूररथ फिरवला जाईल व त्या माध्यमातून मुंबईच्या गल्लीबोळात भाजप व शिवसेनेच्या भ्रष्टाचाराची माहिती जनतेला देण्याचे काम करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

माजी खासदार आणि पक्षाचे सोशल मिडिया प्रभारी आनंद परांजपे म्हणाले की लोक प्रचंड मेहनत करून पैसे कमवतात आणि ते पैसे बँकेत ठेवतात. मात्र, बँकांमध्ये हे पैसे सुरक्षित नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नैराश्य आहे. या राज्याचा विकास करण्याची कुवत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये परिवर्तन करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हाच पर्याय निवडा, असे आवाहन त्यांनी केले.

माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. हेमंत टकले, आ. विद्या चव्हाण, आ. ॲड. जयदेव गायकवाड, माजी खासदार संजय दिना पाटील, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आ. अशोक धात्रक, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, पक्षाचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.