सत्ताधाऱ्यांना मराठी भाषेबद्दल ठराव मांडावा लागतो, ही मराठी भाषेवर ओढवलेली नामुष्की – सुनील तटकरे

05 Mar 2018 , 06:09:29 PM

राज्याच्या विधिमंडळात आज आपल्याला मराठी भाषेसंबंधी ठराव मांडायची वेळ का आली? मराठीचा ढोल बडवत गेल्या चार वर्षात जे लोक सत्तेवर बसले आहेत, त्यांना हा ठराव मांडावा लागत आहे, यापेक्षा जास्त नामुष्की मराठी भाषेवर ओढवली नाही, अशी टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. विधानपरिषदेत सभापतींच्या मराठी भाषेच्या ठरावावर बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी तटकरे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

काल राज्यपालांच्या भाषणाचे मराठी भाषांतर झाले नाही. आज मराठी अभिमान गीतातील कवी सुरेश भटांच्या कवितेचे शेवटचे कडवे गाळण्यात आले. लोकराज्य मासिक गुजराती भाषेत सुरु करण्याची किमया याच सरकारच्या काळात झाली. स्व. बाळासाहेब असते, तर असे झाले नसते. एका बाजूला आपण बेळगावात कानडी सक्तीच्या विरोधात लढत आहोत, तर दुसरीकडे लोकराज्य गुजरातीत चालू करण्यास शिवसेना समर्थन करत आहे, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही, असे ते म्हणाले.

शिवसेनेचे तीन खासदार केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले व त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत विनंती केली. मंत्र्यांनी स्पष्ट भाषेत नकार दिल्यावर तीनही खासदार निमूटपणे माघारी आले. अभिजात दर्जा मिळाला असता, तर सेनेने ढोल बडवले असते. पण सत्तेत असताना तोंडावर नकार मिळूनही चकार शब्दाचा निषेध नोंदवला नाही, याबाबत त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

आम्ही सत्तेत असताना मराठी रात्रशाळा सुरु केल्या होत्या. आज मराठी शाळांची गळचेपी केली जात आहे. या निर्णयाचा सरकार खुलासा करेलच. पण राज्यातील ग्रामीण भाग व कोकणातील वाड्या-वस्त्यांतील विद्यार्थ्यांना याची झळ बसेल. आज मांडलेला ठराव सभापतींनी मांडलेला असल्यामुळे या सार्वभौम सदनाच्या भूमिका त्यात आहेत. या ठरावाला आमचा पाठिंबा असून गेल्या दोन दिवसांत ज्या चुका झाल्यात, त्या पुन्हा होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.

मराठी ही राज्याची अस्मिता आहे. मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. सरकारची थोडी अधिक जबाबदारी आहे, त्या अनुषंगाने सरकारने पावले उचलावीत, असेही त्यांनी नमूद केले.

याच ठरावावर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  म्हणाले की मराठी भाषा विभागातील ४० टक्के पदे रिक्त आहेत. मंत्रालयातील अनेक सचिव, अधिकारी यांच्या टिप्पणी मराठीत नसतात. आज मराठी भाषेबद्दल ठराव मांडला जात असताना या बाबींचाही विचार व्हायला हवा.

सदर ठरावाबाबत आमदार हेमंत टकले यांनीही आपले मत व्यक्त केले. आजचा दिवस फार उत्साहात, आनंदात आपण साजरा करत आहोत. १९४२ च्या लढ्यात कुसुमाग्रज यांची 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' हे गीत क्रांतिकारकांच्या ओठावर होते. तेच कुसुमाग्रज स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'कणा' नावाची कविता लिहून सामान्य माणसांचे दु:ख व्यक्त करतात. सुरेश भट यांच्या कवितेत 'लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी', असे कडवे आहे. माझ्याबाबतीत 'लाभले भाग्य मला, कुसुमाग्रज यांचा सहवास मिळाला', असे मी म्हणू शकतो. मराठी भाषेचे अस्तित्व ज्या साहित्यिकांनी, कवींनी आपल्यासमोर आणले आहे, त्यांचा ठेवा जतन करणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे’, असे ते म्हणाले.

संबंधित लेख